Breaking News

“भारत जोडो यात्रेत भ्रष्टाचारातील पैशांचा वापर”

खर्चाच्या चौकशीची भाजपची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आरोप केला आहे. मागील अडीच वर्षांतील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा या यात्रेसाठी वापरण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे तसेच या यात्रेवर होणार्‍या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने सोमवारी रात्री महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर मंगळवारी (दि. 8) सकाळी देगलूरमधून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर टीका करताना म्हटले की, या यात्रेत खर्च होणारा पैसा, काँग्रेसचा पैसा कुठून आला व कोणी खर्च केला याची चौकशी उपमुख्यमंत्री आणि गृह विभाग सांभाळणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी करावी. काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून किती पैसे यात्रेसाठी वापरण्यात आले आहेत आणि प्रत्यक्षात किती यात्रेसाठी किती खर्च झाला? काँग्रेस नेत्यांनी जो खर्च केला आहे तो कुठून केला आहे हे या चौकशीत तपासले पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पुढे म्हटले की, भारत जोडो यात्रेत लोक स्वतःहून येत नसून त्यांना आणले जात आहे. ही यात्रा नेत्यांनी हायजॅक केली आहे. ज्या जिल्ह्यातून यात्रा जाते, त्या जिल्ह्यातील नेत्यांच्या मुलांना पुढे आणले जात आहे.

पुढच्या काळात काँग्रेसला धक्के बसणार!
काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या यात्रेदरम्यानच भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले. 2024पर्यंत महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण विचार करू शकणार नाही असे नेते भाजपमध्ये येतील. सध्या राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत म्हणून काँग्रेसचे नेत्यांचे त्यांच्यासमोर बोलणे आणि शक्तीप्रदर्शन करणे सुरू आहे, मात्र पुढच्या काळात काँग्रेसला धक्के बसणार असणार असल्याचे सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी केले.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply