शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांची माहिती
मुरूड : प्रतिनिधी
स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नामुळे अलिबाग-मुरूड रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरणासाठी नाबार्डतर्फे निधी उपलब्ध झाला असून, हे काम मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी मुरूडमधील पत्रकारांना दिली. राजा केणी एका कार्यक्रमानिमित्ताने मुरूड येथे आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अलिबाग-मुरूड रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. शिंदे गटाच्या महिला संघटिका शुभांगी करडे, मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, अमोल लाड या वेळी उपस्थित होते. अलिबाग व मुरूड तालुक्यात जनता दरबार आयोजित करून आमदार महेंद्र दळवी लोकांचे प्रश्न ऐकून घेणार आहेत. या जनता दरबारात सर्व शासकीय कार्यलयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील, अशी तरतूद करण्यात आल्याची माहिती केणी यांनी दिली. जलजीवन मिशन योजना व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत मुरूड व अलिबाग तालुक्यात काही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या लवकरात लवकर कार्यान्वित व्हाव्यात, यासाठी आमदार दळवी यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे केणी यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांत समविचारी पक्षाशी युती केली जाणार आहे. जास्तीत जास्त नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य निवडून आण्याचा आमचा निर्धार असल्याचे जिल्हाप्रमुख राजा
केणी यांनी या वेळी स्पष्ट केले.
Check Also
आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …