अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील थळ येथे आरसीएफ प्रकल्प परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. ही अफवा असल्याची चर्चा होती, पण बिबट्याचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला आरसीएफ व वनखात्याच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी थळ येथील आरसीएफ कंपनीच्या परिसरामध्ये झाडीत बिबट्या वावरताना गस्त घालणार्यांना दिसला. याची माहिती वनखात्याच्या अधिकार्यांना देण्यात आली. ही बातमी समाजमध्यमातून वार्यासारखी पसरली. याचा कुणी सत्य, तर कोणी अफवा म्हणून अर्थ काढला. अखेर याबाबत प्रत्यक्ष आरसीएफच्या एका जबाबदार अधिकार्याने समाजमाध्यतून फिरणारे बिबट्याचे वृत्त खरे असल्याची माहिती दिली. शिवाय वनखात्याच्या सूत्रानेदेखील याला दुजोरा दिला आहे. सुदैवाने हा बिबट्या नागरी वस्तीत शिरला नाही. तो जंगल भागात परत गेल्याचा दावाही वनखात्याच्या सूत्राने केला आहे.
काही दिवसांपूर्वी कोळगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त होते. काही जनावरांवर त्याने हल्ले केल्याचे सांगितले जात होते. आता आरसीएफ परिसरात बिबट्या दिसल्याने तालुक्यातील जंगल भागात बिबट्या आहे, हे स्पष्ट झाले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …