मोहोपाडा : प्रतिनिधी
मोहोपाडा येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 1998 साली इयत्ता दहावीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात जनता विद्यालय शाळेच्या सभामंडपात झाला. दहावीच्या वर्गांतील हे विद्यार्थी 24 वर्षांनंतर (दोन तपे) एकमेकांना भेटले. या कार्यक्रमास 1998 साली अध्यापन करणारे चार शिक्षकही स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. या वेळी शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर माजी शिक्षक व कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या आप्त व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी 1998 मध्ये अध्यापन करणारे बाळासाहेब सावर्डे, डी. सी. तायडे, डी. के. कांबळे व शशिकांत जाधव या शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांनी शाळा व मित्रांसंबंधी आठवणी जागवल्या. या कार्यक्रमासाठी मेहनत व विखुरलेल्या मित्रांना संपर्क साधून एकत्र आणण्यासाठी निलेश बाबरे यांनी पुढाकार घेऊन सर्व वर्गमित्रांना एकत्र आणले. या स्नेहमेळाव्यात 24 वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गंमित्रांनी सन 1998 नंतर आपापला जीवनप्रवास सांगितला. यात कोणी डॉक्टर, इंजिनिअर, कंत्राटदार, मटेरियल सप्लायर्स, मार्केटींग मॅनेजर, कपडा व्यवसायीक, कंपनी कामगार आदी झाल्याचे परिचय देताना सांगितले. संतोष पाटील, नरेश जांभळे, निलेश पारंगे, उमेश जांभळे, जयराम कोकंबे, मंगेश डवळे, महेन्द्र जाधव, जगदिश कदम, अमित शहा यांनी सहकार्य केले. ज्योती, अश्विनी, अंजना, सुष्मा, रोहिणी, निता यांच्यासह सन 1998 वर्गमित्र उपस्थित होते.