नवी मुंबई : बातमीदार
सदैव मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे टाइनि एन शायनि (किड्स हेअरकट सलून) शेट्येज् कॉन्सिअस पॅरेंटिंग आणि दुर्गेश्वरी महिला मंडळ ह्या तीन संस्था एकत्र आल्या. बेलापूरच्या सेक्टर 8मधील आंगणवाडीतील लहान मुलांना त्याच्या बालपणीच्या रमणीय, आनंददायी दिवसामधील बालदिन हा संस्मरणीय व्हावा आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्वाकडे त्यांची वाटचाल अधिक दृढतेने व्हावी ह्यासाठी विविध खेळ, गोष्टी, गाणी ह्याचबरोबर स्वसंरक्षणाचे धडे याचे आयोजन करण्यात आले होते. टाइनि एन शाइनिच्या संचालिका दीप्ती कीर्तिकर यांच्या मते मुलांच्या आत्मविकासाबरोबर त्यांना समाजातही निडरतेने वावरण्यासाठी सामाजिक सभ्यता शिकवणे गरजरेचे असते. केस कर्तन केल्यामुळे मुलांना नीटनेटकेपणाची आवड निर्माण होऊन त्यांची स्वप्रतिमा अधिक उजळून समाजात ते आत्मनिर्भरतेने वावरू शकतील. मुलांच्या शारीरिक वाढीबरोबर मनाचीही जडणघडण होत असते. सातत्याने आजूबाजूला घडणार्या गोष्टींचा मुलांच्या मनावर उमटणार्या प्रतिमांचे कायम स्वरूपी धारणेत रूपांतरण होते. ही धारणा पक्की झाली की तिचे स्वभाव आणि वर्तनातून पडसाद उमटू लागतात. जागतिक आरोग्य संघटनेने 21 वे शतक हे मानसिक अस्वास्थ्याचे शतक म्हणून जाहीर केले आहे. विविध जागतिक आकडेवाडीनुसार मुलामुलींमध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडतील अशी हिंसकवृत्ती, तापटपणा, नैराश्य वाढताना दिसत आहे. ह्या सार्यांचे मूळ समाजातील गरीब श्रीमंत दरी बरोबरच चढाओढ, अति महत्त्वकांक्षा, ईर्षा, अधिकतेची हाव, असंतुष्टपणा ह्यामध्येच आहे. उज्ज्वला शेट्ये, शेट्येज् कॉन्सिअस पॅरेंटिंगच्या संस्थापिका म्हणतात, भारतीय संस्कृतीचे मर्मस्थान हे सुदृढ आनंदी मन आहे. आनंदी आणि प्रेमळ वातावरणात वाढलेली मुलं निकोप समाज निर्मितीसाठी सहाय्यक ठरतात ह्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.सामाजिक बांधिलकीचे भान सर्वांमध्ये जागृत झाल्यास समाजात समानता राखण्यास मदत होईल. दुर्गेश्वरी महिला मंडळाची संस्थापिका वर्षा नाथ यांनी सांगितले, आम्ही समाजातील दुर्बल घटकातील मुलांचे पालकत्व स्वीकारून आपल्या देशाची भावी पिढी ही अधिक सजग, भावनिकदृष्ट्या सक्षम, वैचारिक दृष्ट्या कशी समृद्ध होईल यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील. दुर्बल मनाला सबलीकरणासाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवताना शीतल निकम म्हणाल्या की, उत्तम संस्काराचे बीज रोपण आणि आनंददायी संस्मरणीय बालपण हे आजच्या दिवसाचे प्रयोजन आजचा बालदिन उपक्रम हा त्यातीलच एक महत्त्वपूर्ण भाग होता. मुले खाऊ आणि बक्षीस घेऊन ’पुन्हा याल ना?’ हे प्रेमळ निमंत्रण आम्हाला देऊन आनंदाने घरी गेली.
RamPrahar – The Panvel Daily Paper