केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वांत स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावित विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे फक्त कोकणालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह अशी कामगिरी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने केली आहे. त्याबद्दल भारत सरकार व युनिसेफच्या वतीने स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार 2021-22 या पुरस्काराने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते शनिवारी (दि. 19) नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्लीतील संसद मार्गाजवळील आकाशवाणी रंगभवनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह, केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, सहसचिव अर्चना अवस्थी-शर्मा व प्राची पांडे उपस्थित होते. सन्मानपत्र आणि 60 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभात हा सन्मान रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, शिक्षिका जसविंदर कौर, अनिता मिश्रा, ईफ्फत काटे, हेड बॉय मास्टर आदेश परेश ठाकूर, स्पोर्ट्स कॅप्टन अथर्व सांडगे, स्कूल व्यवस्थापन प्रतिनिधी अॅड. विनायक कोळी यांनी स्वीकारला.
भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22साठी शाळांचे नामांकन मागविण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख तीन हजार शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन केले होते. यातून जिल्हा व राज्य पातळीवर सर्वेक्षण करून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर या शाळेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार 2021-22मध्ये आठ लाख 23 हजार विद्यालयांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावर एकूण 39 शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने अव्वल कामगिरी करीत राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22सन्मान प्राप्त केला.
दरम्यान, पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि युनिसेफच्या वतीने फोटोग्राफरची टीम रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पाठविण्यात आली होती. त्यांनी सहा तासांहून अधिक वेळ शाळेची शूटींग आणि फोटो काढले होते. त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीचे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते रिमोटद्वारे प्रकाशन पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी करण्यात आले आणि ती जगभरात प्रसारित करण्यात आली.
पुरस्कारप्राप्त विद्यालय राज्यातील विद्यालयांसाठी अॅम्बेसिडर ठरलेत -ना. डॉ. सुभास सरकार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत उद्दिष्टाने प्रेरित होऊन लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने स्वच्छ विद्यालय हे महत्त्वपूर्ण अभियानही त्यांनी सुरू केले. भारतीय शिक्षण पद्धती आणि परंपरेचा समन्वय साधण्याचे काम या अभियानातून होत आहे. त्यामुळे हा पुरस्कार विद्यालयांसाठी प्रेरणादायी आणि अत्यंत महत्त्वाचा असून पुरस्कारप्राप्त विद्यालय त्या राज्यातील विद्यालयांसाठी अॅम्बेसिडर ठरले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभास सरकार यांनी या वेळी केले.
शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि विद्यालय एक मंदिर आहे. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ व प्रफुल्लित वातावरणात असले पाहिजे. त्या अनुषंगाने या उपक्रमाची योजना आखण्यात आली. देशातील लाखो विद्यालयांनी यात सहभाग घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांतून हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला आहे.
-डॉ. राजकुमार रंजन सिंह, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्रीशाळेला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जात आहे. त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच शाळेने यशाचे शिखर गाठले आहे. या सन्मानाने विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल अभिमान वाटत आहे.
-राज अलोनी, मुख्याध्यापिका, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर