आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पनवेल जिमखाना येथे झालेल्या आंतरविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत दणदणीत विजय प्राप्त केला. विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरावर झालेल्या या बॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयाच्या तब्बल 16 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. 14 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये श्रवण शेजल व श्रवण चाचर या दोघांनी द्वितीय क्रमांक तर तन्मय दळवी याने 44 ते 46 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. 17 वर्षांखालील मुलांच्या वयोगटात अथर्व म्हात्रे (80 किलो) वजन गटात याने प्रथम क्रमांक प्राप्त केला, तसेच स्मित भोईर (52 ते 54 किलो) याने प्रथम तर आदित्य कोडलकर व प्रज्वल भोर (70 ते 75 किलो) याने द्वितीय क्रमांक पटकावला.
17 वर्षांखालील मुलींच्या वयोगटात लिशा गायधनकर हिने प्रथम तर जान्हवी पवार व कृपा संधा यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 60 ते 63 किलो वजन गटात स्मिता शर्मा हिने प्रथम क्रमांक मिळवला, तसेच 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या स्पर्धेत मनस्वी गोवारी हिने प्रथम तर प्राची गोवारी हिने द्वितीय क्रमांक मिळवला. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले, तसेच रायगड विभाग इन्स्पेक्टर कामोठे रोहिदास ठाकूर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या क्रिडा शिक्षक प्रतिज्ञा पाटील, रुपाली जोगदंड व हितेश कडू यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.