कोठिंबे येथे जमिनीची खरेदी
कर्जत : प्रतिनिधी
भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथे जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ते कर्जतकर झाले आहेत.
कर्जत आणि फार्महाऊस हे समीकरण बनले आहे. येथील प्रदूषणमुक्त वातावरणासोबत निसर्ग, बारमाही वाहणार्या नद्या यामुळे विविध क्षेत्रांतील लोक कर्जतमध्ये सेकंड होम बांधून विकेण्डला येत असतात. त्यात राजकीय नेत्यांच्या असलेल्या टुमदार बंगल्यांमुळे कर्जत अधिक ठळकपणे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.
आपल्या देशाला क्रिकेटमधील पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव हेही कर्जतच्या प्रेमात पडले. त्यांनी तालुक्यातील कोठिंबे भागात जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीचे दस्त कपिल यांच्याकडून नेरळ येथील सह निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले. याची कार्यवाही करणारे कर्जत बार असोसिएशनचे वकील भूपेश पेमारे आणि सहनिबंधक महेंद्र भगत यांनी याबाबत गुप्तता पाळली होती. तरीही कपिल आल्यानंतर चाहत्यांची गर्दी झाली.
कपिल यांनी कोठिंबे येथे 25 एकर जमीन खरेदी केली असल्याची माहिती मिळत असून त्यासाठी काही लाखांत स्टॅम्प ड्युटी भरली असल्याची माहिती समोर येत आहे. अन्य सेलिब्रिटीप्रमाणे कपिलही आता कर्जत तालुक्याचे रहिवासी बनणार आहेत.