पर्यटकांना मोठा दिलासा; जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी
मुरूड ः प्रतिनिधी
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने राजपुरी नवी जेट्टी येथे असणारे वाहनतळ अखेर खुले केल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यातील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक मुरूडमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी (दि. 4) 15 शिडाच्या बोटींतून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर
नेण्यात येत होते. सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी येथून शिडाच्या बोटीतून पयटकांना नेले जाते. राजपुरी येथे जंजिरा किल्ला पहाण्यासाठी शेकडोच्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटक लोकांची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून भले मोठे प्रवासी टर्मिनल बांधण्यात आले आहे. यामध्ये प्रवासी वर्गाला बसण्याची व्यवस्था, अल्पोहार, स्वछतागृह व शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच वाहन पार्किंग व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. प्रवासी टर्मिनलची इमारत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून पाच वर्षाच्या कराराने बून केटरर्स याना देण्यात आला होता, परंतु या बून केटरर्सकडून प्रवासी टर्मिनलची इमारतीची फारशी काळजी घेतली जात नाही. अनेक महिन्यांचे बिल न भरल्यामुळे येथील वीज जोडणी तोडण्यात आली होती. बून केटरर्सने लिलावाचे पूर्ण पैसेसुद्धा महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाला न दिल्यामुळे बोर्डाने वाहन पार्किंग बंद करून या गेटला टाळे
मारण्यात आले होते. सुमारे 150 वाहन पार्किंग असणारे गेट बंद केल्यामुळे असंख्य पर्यटकांच्या गाड्या समुद्रकिनारी व रस्त्यावर उभ्या कराव्या लागल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने राजपुरी नवी जेट्टी येथे असणारे वाहनतळ खोलावे व पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटक यांच्याकडून करण्यात आली होती. अखेर वाहनतळाचा दरवाजा उघडण्यात आल्याने शेकडो पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.