Breaking News

नवी मुंबईत पर्यावरणपूरक विकासकामांना गती

केंद्राच्या अमृत योजनेतून मिळणार पाठबळ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरासभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरण सुलभतेकरिता महापालिकेने सादर केलेल्या 311 कोटींच्या कामांना राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. या योजनेंतर्गत विविध कामांना अनुदान मिळण्यासाठी राज्यमंत्री मंडळाची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत नवी मुंबई महापालिकेच्या 28 पैकी 10 कामांना मंत्री मंडळाने परवानगी दिल्याने पर्यावरणपूरक विकासकामांना अमृत योजनेतून पाठबळ मिळणार आहे.
नवी मुंबई शहराची 1970च्या दशकात सिडकोने जमीन संपादन करून नेदरलँडच्या धर्तीवर विकास केला. समुद्राच्या भरतीचे पाणी शहरात येऊ नये म्हणून धारण तलाव करून भलीमोठी पंपिंग स्टेशन यंत्रणा बसवली. बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी आणि कोपरखैरणे या भागात धारण तलावांमध्ये पंप बसवण्यात आले. 35 वर्षांपूर्वी सिडकोने बसवलेली ही सर्व यंत्रणा जुनी झाल्याने क्षमता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत शहराला पुन्हा समुद्राच्या आणि पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ही सर्व यंत्रणा बदलण्याची गरज महापालिकेने व्यक्त केली आहे.
यानुसार महापालिकेने सादर केलेल्या या पाचही ठिकाणच्या धारण तलावांचे पंपिंग स्टेशन बदलून नव्याने यंत्रणा बसवण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार बेलापूर सेक्टर 20 आणि 25 येथील धारण तलावांवर बांधकाम करून सेक्टर 6 येथे नवीन पंप बसवण्यात येणार आहे. शिरवणे नेरूळ सेक्टर 1 ए येथे पंपिंग स्टेशनचे बांधकाम व नेरूळ सेक्टर 4 येथे जुने पंप काढून नवीन पंप बसवण्यात येणार आहे. सानपाडा सेक्टर 9 येथे नवीन बांधकाम व वाशी सेक्टर 30 येथे नवीन पंप बसवण्यात येणार आहे. तसेच वाशी सेक्टर 3, 12 आणि 28 येथे पंपिंग स्टेशनचे बांधकाम केले जाणार आहे. कोपरखैरणे सेक्टर 1 ए आणि 2 ए येथे पंपिंग स्टेशनचे बांधकाम केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेतून राज्य व केंद्र सरकार अनुदान देणार आहे. उर्वरित खर्च महापालिकेला स्वतःच्या तिजोरीतून करावा लागणार आहे.

ऐरोलीतील सांडपाणी शुद्धीकरणासाठी प्रकल्प
ऐरोली येथील यादवनगर परिसरात महापालिकेतर्फे नवे मलनिस्सारण केंद्र तयार केले जाणार आहे. या परिसरातील सांडपाणी खाडीपात्रात शुद्ध करून सोडण्यासाठी दोन एमएलडी इतक्या क्षमतेचे हे केंद्र तयार केले जाणार आहे; तर सीबीडी-बेलापूर येथे नवे प्रक्रियाकृत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे 10 एमएलडी क्षमतेचे टर्शरी ट्रीटमेंट प्लांट तयार केले जाणार आहे. या केंद्रातून बेलापूर परीसरातील उद्यान, रस्त्याच्या दुभाजकांवरील झाडे, हरितपट्टे, वाहन धुण्यासाठी महापालिकेला पाणी उपलब्ध होणार आहे.

बेलापूरला 24 तास पाणीपुरवठा
बेलापूर शहराला 24 तास पाणीपुरवठा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल महापालिकेने उभारले आहे. या नोडला धरणाहून कळंबोली मार्गे शहरातील पंपिंग स्टेशनला येणारी जलवाहिनी जुनी आणि जीर्ण झाली आहे. साधारणः 37 वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने टाकलेली वाहिनी बदलण्यासोबतच तळोजा खाडीपूलावर एक पूल तयार केला जाणार आहे. बेलापूरमध्ये आलेले पाणी घरोघरी उच्च दाबाने पुरवठा करण्यासाठी 31 किलो मीटर अंतराची नवीन जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे.

महापालिकेतर्फे अमृत योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे होणार आहेत. ही सर्व कामे 2055 पर्यंत महापालिकेला सेवा देतील, अशी रचना करण्यात आली आहे.
-संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

 

Check Also

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा अध्यादेश काही दिवसांत काढणार -मुख्यमंत्री

नवी मुंबई ः बातमीदार सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्या अध्यादेशावर माझी …

Leave a Reply