Breaking News

अतिवृष्टीच्या निर्बंधांमुळे व्यापारी संतप्त; सूचनेनुसार पनवेलमधील दुकानांचे शटर डाऊनच

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय हवामान विभागाने 9 जून ते 12 जून या कालावधीत रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. या कालावधीत अतिपर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात जीवित व आर्थिक हानी होऊ नये याअनुषंगाने दुकानेही बंद ठेवण्यासंदर्भात आदेश पारित केले. जेणेकरून याकाळात नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी न झाल्याने व्यापारीवर्गाला विनाकारण दुकाने बंद ठेवावी लागली असल्याचे सांगत व्यापार्‍यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे लॉकडाऊनकाळात व्यापार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मालाची विक्री न झाल्याने माल तसाच पडून राहिला व मोठे नुकसान झाले. नोकरांचे पगार, जागेचे भाडे, मालाचे नुकसान अशा अनेक अडचणींमुळे व्यापारी त्रस्त झाले असल्याचा सूर व्यापार्‍यांमधून व्यक्त होत आहे. पनवेल हे आजूबाजूच्या अनेक खेडेगावांची मुख्य बाजारपेठ असल्याने तालुक्यातील सर्व नागरिक पनवेलमध्ये खरेदीसाठी येत असतात. अनलॉकिंगच्या पहिल्याच दिवशी अनेक दिवसांपासून खरेदीसाठी प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंसह इतर चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलच्या बाजारपेठेत हजेरी लावली. ऑनलाइन खरेदीला नापसंती देत स्थानिक व्यापार्‍यांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी प्रथम पसंती दर्शवली. त्यामुळे व्यापारी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. परंतु अनलॉकिंगनंतर दोन दिवसांतच दुकाने पुन्हा चार दिवसांसाठी बंद करावी लागल्याने व्यापारीवर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली. नव्याने सुरू झालेली दुकाने पुन्हा एकदा विनाकारण चार दिवस बंद ठेवावी लागत असल्याने पनवेलच्या व्यापारी वर्गात जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. त्यातच गुरुवारी व शुक्रवारी अतिवृष्टीच्या अंदाजामुळे प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने पनवेलच्या व्यापारीवर्गात तीव्र नाराजीचा सूर उमटताना दिसून आला. कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करत व्यापारी वर्गाने प्रशासनाला वारंवार सहकार्य केले आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार अनलॉकिंग प्रक्रियेत पुन्हा एकदा दुकाने पूर्ववत सुरू झाली. परंतु अतिवृष्टीच्या अंदाजाने प्रशासनाने चार दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापारीवर्गाच्या संयमाचीही एक मर्यादा आहे; अन्यथा व्यापार्‍यांनाही त्यांच्या पद्धतीने उठाव करावा लागेल. आजवर व्यापार्‍यांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे, तरी प्रशासनानेही व्यापार्‍यांचा विचार करून त्यांच्यावर अन्याय करू नये, असे पनवेल मनपा नगरसेवक राजू सोनी यांनी म्हटले आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट

काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या दुकानांचे शटर डाऊन झाल्याने पनवेलच्या बाजारपेठेत चार दिवस शुकशुकाट पाहायला मिळाला. नागरिकांचीही वर्दळ नसल्याने बाजारपेठा निर्जन दिसून आल्या. निर्बंधांमुळे दुकाने बंद होती, परिणामी व्यापारी वर्ग नाराज असल्याचे पहावयास मिळाले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply