Breaking News

नवीन पनवेल उड्डाणपूल व एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामुळे कामाला मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांची मंजुरी दिली होती. त्या विकासकामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 5) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमास माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सिडकोचे कार्यकारी अभियंता अनिल बैले, वाहतूक शाखेचे अधिकारी संजय नाळे, उदित नाईक, श्रीनिवास कोडरू, तन्मय बिरजे, विवेक होन, अक्षय सिंग, शिवाजी भगत आदी उपस्थित होते.
नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणार्‍या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाणपुलाची पावसामुळे दुरवस्था झाली होती. येथील खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या उतारावरील दोन्ही बाजुला सिमेंट काँक्रीटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भरपावसामध्ये पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
आमदार प्रशांत ठाकूर व भाजप कार्यकर्त्यांनी हिरीरिने सहभाग घेत पावसात भिजत रस्ता अडवल्यावर सिडकोचे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून आम्ही दोन महिन्यांत टेंडर प्रोसेस सुरू करतो तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते, पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले, तर काही जण रस्त्यावर झोपले होते. शेवटी सिडको प्रशासन या आंदोलनापुढे नमले आणि सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी या पुलाच्या चारी बाजूंचे काँक्रीटीकरण करण्याची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले होते.
या अनुषंगाने सिडकोकडून न्यू पनवेल आरओबी येथे डेक स्लॅबच्या रिसरफेसिंगसह जोडरस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे या शीर्षकाखाली दोन कोटी 48 लाख 69 हजार 839 रुपयांची बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार या कामाचे गुरुवारी भूमिपूजन झाले. यामुळे वाहनचालक, प्रवासी, नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात येत आहेत.

 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply