नेरूळमध्ये रहिवाश्यांनी केली परिसराची साफसफाई
नवी मुंबई : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा असेल तरच आपल्या प्रभागासह शहराचेदेखील नाव उंचावले जाते. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेरूळ सेक्टर 2 मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटसह स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असूनदेखील नागरिक रस्त्यावर तसेच इतर मोकळ्या जागेकर कचरा फेकतात. त्यामुळे अनेक ठिकाणी परिसराला बकालपणा आलेला पाहायला मिळतो. नेरूळ परिसरातील कचर्याची परिस्थिती पाहिली तर नेरूळ विभागामध्ये अनेक ठिकाणी ओल्या सुक्या कचर्याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे परिसरातील बकालपणा हटवण्यासाठी रहिवाशांनी स्वतः हातात झाडू घेऊन नेरूळमधील परिसर स्वच्छ करत इतरांनाही स्वच्छतेचा संदेश देत संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. कचरा कुंडी मुक्त शहर करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक प्रभागांमधील कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत, मात्र अनेक नागरिकांना कचरा कुंड्या का हटविल्या आहेत हेच माहिती नसल्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर, मोकळ्या जागेवरच कचरा फेकतात. त्यामुळे अनेक सोसायटीमधील रहिवाशांना तसेच येणार्या जाणार्या नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नेरूळ सेक्टर 2 मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटच्या गेट समोर अनेक वेळा नागरिक कचरा टाकतात. परिसरामध्येदेखील कचरा फेकला जातो त्यामुळे इतर परिसरासह अपार्टमेंटच्या गेटसमोरील परिसर स्वच्छ केला आहे. या परिसरामध्ये येणार्या जाणार्या नागरिकसंह इतर सोसायटीतील नागरिकदेखील रात्रीच्या वेळी कचरा फेकतात म्हणून सोसायटी मधील रहिवाशीच इथे रात्रीच्यावेळी गस्त घालत आहे. जेणेकरून ह्या परिसरामध्ये कचर्याचे ढीग साचू नयेत. तसेच पालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांनी नेरूळ विभागातील कचर्याच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करून उपाययोजना केल्या आहेत. पालिकेच्या माध्यमातून नेरूळमध्ये प्रत्येक विभागात कचरा टाकू नये असे फलक लावून जनजागृती केली जात आहे. ठिकठिकाणी फलक रंगरंगोटी करण्यात आली आहे. तरीदेखील काही नागरिक कचरा इतरत्र टाकतात हे योग्य नाही, असे स्थानिक रहिवासी संतोष भिसे यांनी सांगितले.
स्वच्छ भारत अभियानात माझा कचरा, माझी जबाबदारी ही ओळ केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न ठेवता नेरूळ विभाग कार्यक्षेत्रातील रहिवासी सोसायट्या आणि नागरिकांनी पुढाकार घेत स्वत: झाडूसह इतर स्वच्छता साधने हातात घेत साफसफाई केली आणि स्वच्छतेचा नवा आदर्श स्वकृतीतून प्रदर्शित केला ही स्वागतार्ह बाब आहे.
-बाबासाहेब राजळे, उपायुक्त, नवी मुंबई मनपा