Breaking News

हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
  • खारघरमध्ये भारती विद्यापीठ मेडिकव्हर रूग्णालयाचे उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्त
कोरोनानंतर प्रगत देशांनाही आरोग्य क्षेत्रातील उणिवा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे देशासह जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करण्याची गरज लक्षात आली आहे. दोन-तीन दशकांपासून आरोग्य क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहे. हेल्थ केअर क्षेत्र हेल्थ टूरिझमच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. या हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे मेडिकव्हरसारख्या संस्था तयार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारती विद्यापीठ मेडिकव्हर रुग्णालयातर्फे खारघर सेक्टर 10 येथे 310 खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबई आणि आजूबाजूला राहणार्‍या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विदयापीठाचे कुलगरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, मेडिकव्हर रूग्णालयाचे (इंडिया) अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा, मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रीक स्टेनमो आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, भारती विद्यापीठाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मानव संशोधन निर्माण केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हे भारतीय विद्यापीठाची खासियत आहे. आता भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हरच्या संयुक्त विद्यामाने एक नवीन रूग्णालय सुरू करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, भारती विद्यापीठाची स्थापना पंतगराव कदम यांनी बहुजन समाजातील नागरिकांसाठी केली आहे. आजवर या भारती विद्यापीठाची शाखांचा देशभरात विस्तार झालेला आहे. ग्रामीण भागात राहणार्‍या मुलांना उच्च शिक्षण मिळावेत, या हेतूने 85 गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हर या ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी काम करीत आहे.
मेडिकव्हर रुग्णालयाचे (इंडिया) अध्यक्ष आणि वैद्यकिय संचालक डॉ. अनिल कृष्णा म्हणाले की, मेडिकव्हर रूग्णालयाने आपला सात वर्षांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. नवीन हॉस्पिटल सुरू करण्यामागील प्रमुख उद्दिष्ट या क्षेत्रातील उपलब्ध आरोग्यसेवा सुधारणे हे होते. आतापर्यंत देशभरात मेडीकव्हर ग्रुपचे 24 रूग्णालय असून सर्वत्र या वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तळागाळातील नागरिकांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सोयीसुविधा पुरविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रात सध्या पुणे, नवी मुंबई, नाशिक, औऱंगाबाद और संगमनेर याठिकाणी पाच रूग्णालये कार्यरत आहेत.
मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रीक स्टेनमो म्हणाले की, जगभरात मेडिकव्हर रूग्णालयातर्फे लोकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात काम करण्यात येत आहे. मेडिकव्हर रूग्णालयात मिळत असलेल्या दर्जेदार वैद्यकीय सुविधांवर लोकांचा विश्वास आहे, हेच आमचे यश आहे. भारतातील विविध तीन राज्यात मेडिकवर रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मेडिकव्हरचे सध्या 24 रूग्णालये असून यात पाच हजार खाटांची सुविधा आहे. उत्तम वैद्यकीय उपचार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सर्व सुविधा भारतीयांना पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एकाच खाटांसाठी रूग्णांना सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय भारतातील ग्रामीण भागात 40 हजारहून अधिक मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत भारतात 50 रूग्णालये स्थापना करण्याचे मेडिकव्हर ग्रुपचे उद्दिष्ट आहे. यात 10,000 खाटांची संख्या असणार आहे आणि 25 हजार कर्मचारी कार्यरत असतील.
मेडिकव्हर ग्रुपचे संपूर्ण भारतात एकूण 24 रुग्णालये आहेत. रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी या रूग्णालयात आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात रूग्णालयात कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ऑन्कोलॉजी, बालरोग, स्त्रीरोग, पल्मोनोलॉजी, ईएनटी आणि इतर स्पेशॅलिटीजचा समावेश आहे, ज्यामध्ये उच्च पात्र डॉक्टर, विशेषज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत.

भारती विद्यापिठाने इतकी अद्भूत सुविधा पनवेलकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार! संपूर्ण रायगडसाठी ही अत्याधुनिक सुविधा दिलासादायक ठरणारी आहे. या हॉस्पिटलमध्ये मेडिकव्हर आणि भारती विद्यापिठाने उपलब्ध करू दिलेले डॉक्टर्स आणि तज्ज्ञ येथील रुग्णांना उत्तम व आधुनिक उपचार देतील यात शंका नाहीच, पण हे रुग्णालय रायगडकरांना जीवदान देणारे ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply