ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा ना. उदय सामंत यांना विश्वास
माणगाव : प्रतिनिधी
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची या वेळची निवडणूक परिवर्तनाची असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे शंभर टक्के निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माणगाव येथील प्रचार सभेत केले.
कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी रोजी होत असून या निवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर शिपूरकर व गणेशशेठ वाघरे इंग्लिश मीडियम शाळेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 26) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
या सभेस आमदार भरत गोगावले, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपजिल्हाप्रमुख शाम भोकरे, जिल्हा युवाप्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख अॅड. महेंद्र मानकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलिमा घोसाळकर, भाजपचे शहराध्यक्ष नितीन दसवते, युवा मोर्चाचे चिन्मय मोने, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, नगरसेवक कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, हेमंत शेट, नगरसेविका शर्मिला सुर्वे, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, तळा तालुकाप्रमुख प्रद्युम्न ठसाळ, म्हसळा तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, माणगाव उपतालुकाप्रमुख नितीन पवार, युवा नेते वैभव मोरे, अच्युत तोंडलेकर, जितेंद्र तेटगुरे आदींसह शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, सहा वर्षांपूर्वी पराभूत होऊनही प्रत्येक शिक्षकाच्या तोंडात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे नाव आहे. पराभूत झाल्यानंतरही त्यांनी शिक्षकांशी बांधिलकी सोडली नाही. शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते सातत्याने झटत राहिले. या उलट सहा वर्षांत कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांतून बाळाराम पाटील हे शिक्षकांना सहा वेळा काय एकदाही भेटले नसल्याचे शिक्षक सांगतात. आझाद मैदानात विना अनुदानित शाळांसाठी 31 दिवस आंदोलन झाले. त्या वेळी जोपर्यंत शिक्षकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर म्हात्रेंनी व्यासपीठ सोडले नाही. पूर्वीच्या आमदारांची विधान परिषदेतील उपस्थिती किती आहे. त्यांनी विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांबतीत कधीच आवाज उठविला नाही. शिक्षक मतदारसंघासाठी शासनाकडून येणारा निधी हा विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी, शिक्षण संस्थांसाठी तसेच शाळांकडे जाणार्या रस्त्यांसाठी व शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे, मात्र बाळाराम पाटील यांनी हा निधी गटार बांधण्यासाठी खर्च केला, तसेच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी त्यांनी कधी विधान परिषदेत आवाज उठविला नाही. त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण नाही, परंतु ज्ञानेश्वर म्हात्रे हे एक शिक्षक असून ते मुख्याध्यापक आहेत. त्यांचे स्वतःचे हायस्कूल आहे. ते स्वतः शिक्षक असल्याने त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची माहिती आहे. म्हणूनच त्यांना विधान परिषदेवर निवडून पाठविणे हे तुम्हा आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे.
कोकणातील शिक्षकांनी ठरवलंय या वेळेस कुठल्याही परिस्थितीत आम्ही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी करून आमदार बनवून विधान परिषदेवर पाठवू. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून 80 टक्के इतके मतदान ज्ञानेश्वर म्हात्रेंना होईल. रायगडातून 60 टक्के, तर ठाणे व पालघर येथूनही चांगल्या प्रकारे मतदान होऊन हा सक्षम उमेदवार विधान परिषदेवर निवडून जाईल याची खात्री आहे. येणार्या काळात आपण आचारसंहिता संपल्यावर माणगावात रोजगार मेळावा घेऊ, असेही ना. सामंत यांनी सांगून ज्ञानेश्वर म्हात्रेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे यांनीही आपल्या भाषणात ज्ञानेश्वर म्हात्रेंना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचार सभेत अशोकदादा साबळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.