पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरात चोरी, लुटूमार अशा घटना पाहायला मिळात आहेत. नुकतेच पायी चालणार्या महिलेच्या गळ्यातील लक्ष्मीहार चोरट्यांनी हिसकावून तेथून पळ काढला. यामुळे शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ सुरू असल्याची चर्चा आहे.
नऊ दिवसांपुर्वी (18 जानेवारी) रात्री सव्वा दहा वाजता तक्का परिसरात राहणार्या 64 वर्षीय सुहासिनी कुर्ले या त्यांच्या कुटूंबासोबत मिडलक्सास सोसायटीच्या परिसरातून लोटस एक्सरे सेंटरनजीकच्या रस्त्याने पायी जात असताना हा प्रकार घडला. सुरूची हॉटेल येथून कुर्ले कुटूंबिय पायी चालत असताना 25 ते 30 वयोगटातील दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांच्या दुकलीने सुहासिनी यांच्या गळ्यातील हार हिसकावला. या घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेत असणार्या सुहासिनी यांची अगोदरपासून प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. अचानक हल्ला झाल्याने सुहासिनी यांची दातखिळी बसली होती. त्यामुळे कुर्ले कुटूंबीयांनी प्रजासत्ताक दिनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची नेमणूक होऊन महिना उलटला तरीही पायी चालणार्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, वाहनचोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण कमी झालेले नाही. आयुक्त भारंबे यांनी पदभार स्विकारताच महिला व जेष्ठांच्या सूरक्षेविषयी विशेष खबरदारी घेणार असे आश्वासन दिले होते. पोलीस आयुक्तांनी वाढत्या चोर्यांवर आळा बसण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र तपास शाखा (डीटेक्शन ब्रॅच) पथक आहे. साध्या वेशातील हे पोलिसांचे पथक शहरातील वाढत्या गुन्हेगारींवर प्रतिबंध मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी नेमलेले असतात मात्र तरीही चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.