पनवेल : रामप्रहर वृत्त
गडकिल्ले हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रम गाथा असणारा ऐतिहासिक ठेवा आहे आणि या गडांचे जतन आणि संवर्थन होणे अत्यंत आवश्यक आहे या उदात्त हेतूने पुण्याच्या ’उनाड’ ह्या महाविद्यालयीन युवा युवतींच्या समूहाने आपल्या 55 मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय कारकीर्दीतला प्रारंभीचा केंद्रबिंदू असणारा भोर येथील राजगड सर करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
गड किल्ले हे महाराजांचे देणं आहे त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ’उनाड’ने 24 जाने 2023 ला आपली पहिली मोहिम ’राजांचा गड आणि गडांचा राजा’ म्हणून ख्यातकिर्द असलेल्या ’राजगड’ येथे झाली. आज आधुनिकतेने भारलेले लोक जोशात येवून हे विचारतात की खरचं इतिहास घडला आहे का? जर आपण ’दुर्गसंवर्धन’ नाही केले तर छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा विस्मरणात जाते की काय हा विचार करत बसण्यापेक्षा खरंच कृतीतून सुरुवात ’उनाड’ ह्या समुहाने केली आहे.
’उनाड’ ही एक कॉलेजच्या मुलांचा समूह असून याचा पाया नागेश चव्हाण याने घातला आहे. सुरुवातच स्वराज्याच्या पहिल्या राजधानीपासून करावी या विचाराने पहिलीच मोहिम ’राजगड’ येथे पार पडली. सकाळी 9:30 ला सर्व मावळ्यांनी गड चढायला सुरवात केली. गड सर करून दुपारचे जेवण करून सर्वजण लगेच आपल्या मुख्यकार्यास लागले. सर्व काम सुव्यवस्थित पार पडण्याचा पुरेपूर प्रयत्न ’उनाड’ समुहाने केला. या मोहिमेत मुलांचे गट कररून ’प्लास्टिक व नॉन-प्लास्टिक कचरा वेगवेगळा जमा केला.
यात एकुण तब्बल 40 गोण्या कचरा आणि त्यातही प्लास्टिक च्या गोण्या जास्त होत्या. हे प्लास्टिक ’उनाड’ समुहाने एका स्वयंसेवी संस्थेला ’पुनर्चक्रीकरणा’साठी दिले. सुरुवातीला पद्मावती व सुवेळा माची स्वच्छ करून सदर स्वच्छ केली. हा जमा झालेला सर्व कचरा गडाच्या पायथ्याशी सर्व शिवभक्तांनी आणला. यात सर्वांना नागेश चव्हाण व केदार पाटणकर सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
’उनाड’ समुहाच्या पहिल्याच मोहिमेला 55 मावळ्यांचा प्रतिसाद लाभला. ह्या मोहिमेचे सर्व व्यवस्थापन नागेश चव्हाण ,’मोहिम प्रमुख’ चैतन्य हुले, कॅमेरा माँन निखिल कांबळे व उनाड समुहाची व्यवस्थापन समिती यांच्याद्वारे सुव्यवस्थित व यशस्वीपणे पार पडली.’उनाड’च्या दुर्ग संवर्धन मोहिमेचे सर्व दूर कौतुक होत आहे.