Breaking News

पुढील पंधरा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असेल -विनोद तावडे

कर्जत : प्रतिनिधी
रक्ताचा एक थेंबही न सांडता कलम 370 रद्द करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार न होता श्री राम मंदिर उभारले जात आहे. दहा वर्षांपूर्वी आपल्या पासपोर्टला परदेशात किंमत नव्हती. अशा अनेक चांगल्या गोष्टी आतापर्यंत झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे. पुढील पंधरा वर्षे भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात असेल. या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत कसे मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी येथे केले.
भाजप नेते विनोद तावडे हे कौटुंबिक सोहळ्यासाठी दोन दिवसांच्या कर्जत मुक्कामी आहेत. त्या वेळी त्यांना कर्जतमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी केली होती. त्यानुसार तावडे यांनी कर्जत शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाला गुरुवारी (दि. 23) भेट दिली. भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, सुनील गोगटे, ज्येष्ठ महिला पदाधिकारी कल्पना दास्ताने, भाजप तालुका सरचिटणीस संजय कराळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, युवा कार्यकर्ते किरण ठाकरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, महिला तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, प्रदेश पदाधिकारी ऋषिकेश जोशी, मारुती जगताप, शिरीष कदम, विभाग अध्यक्ष केशव तरे, रमेश कदम आदी उपस्थित होते.
या वेळी तावडे यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना कर्जतसारख्या भाजप विचारांशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये यायला नेहमीच आवडते. मी 1995 ते 2004 अशी नऊ वर्षे कर्जतला नेहमी येत असे. त्या वेळचे कर्जत आणि आताचे कर्जत यामध्ये खूप फरक बघायला मिळत आहे. कर्जत परिसराचा विकास खूप झपाट्याने झाला आहे. येथे पक्ष अधिक मजबूत करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
काँग्रेसचे अमित चाचड भाजपमध्ये
या वेळी कर्जतचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय चाचड यांचे चिरंजीव अमित चाचड तसेच गुंडगे येथील कार्यकर्ते राज सूरज बली यादव आणि रितिका यादव यांनी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच नेरळचे श्रीकृष्ण डुकरे यांना मंडल उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र तावडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर तावडे यांनी गोगटे यांच्या निवसस्थानी जाऊन त्यांच्या वयोवृद्ध मातोश्रींची भेट घेतली.

Check Also

स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …

Leave a Reply