ट्रकसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
पनवेल : वार्ताहर
गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विविध ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणार्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून 1310 खोके अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून 709 खोके मद्याच्या बाटल्या भरलेले सापडले. या सर्व मद्याची किंमत सूमारे दीड कोटी रुपये आहे. गोवा राज्यात निर्मित मद्यसाठ्याची अवैधपणे वाहतूक सूरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरिक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निबंधक योगेश फटांगरे, शहाजी गायकवाड यांच्या पथकाने गोवा मुंबई महामार्गावर पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ सापळा रचला. ट्रक क्रमांक एमएच 04 ईव्हाय 1949 या संशयीत ट्रकला रोखून त्याची तपासणी केल्यावर या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा त्याखाली लपवलेले एक कोटी तीन लाख 98 हजार 200 रुपये किंमतीचे 1310 खोके मद्यसाठा जप्त करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शिवलखन मोतीलाल केवट यास बामन डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले. याची अधिक चौकशी केली असता त्याने ही दारु मुंबईत आणून एका गोडाऊन मध्ये ठेवून नंतर मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ती पुरवठा केली जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोडावून नं. 9, प्लॉट नं. 1290, केडब्लयुसी नोड, खिडूकपाडा येथे छापा घालून सदर गोडावून मधून गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे 709 बॉक्स असा एकूण 51 लाख 12 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून शिवलखन मोतीलाल केवट यास या गुन्हयात अटक केली. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत एक कोटी 54 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.