नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी 20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. या वेळी तेथे असलेला जगज्जेत्ता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने एक विधान केले आहे.
भारताचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना होता. त्यामुळे अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. इतकेच नव्हे क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंनाही निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाचा मान राखून जगज्जेत्ता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन हाही उपस्थित होता. सामना सुरू होण्याआधी भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने इडन गार्डन्स स्टेडिअमवर घंटा वाजवली आणि दिवसाचा खेळ सुरू झाला.
याबाबत नंतर बोलताना मॅग्नस कार्लसन म्हणाला की मला क्रिकेटमधील फारसे काही कळत नाही. जेव्हा घंटा वाजवण्याची वेळ होती, तेव्हा मी तिथे वेड्यासारखा उभा होतो. सामना संपला हेदेखील मला कळले नव्हते. सामना संपला की अजूनही सुरू आहे असे मी विचारले होते, तसंच सामना चालू राहण्याचा काहीच मार्ग नाही का, असाही प्रश्न मी विचारला होता.