Breaking News

कामोठ्यातील सबस्टेशनसाठी महावितरणला भूखंडाचा ताबा द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
वीज ग्राहकांना अखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कामोठे सेक्टर 25 येथील नवीन सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरू होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला प्रस्तावित भूखंडाचा ताबा देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी कामोठे येथे सबस्टेशन उभारण्याची मागणी केली होती, मात्र कोरोना काळ व इतर तांत्रिक बाबीमुळे हा विषय रेंगाळत राहिला. त्या अनुषंगाने डॉ. अरुणकुमार भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे विषय मांडला होता. तो मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार महेश बालदी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत उपस्थित होते.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलेय की, पनवेल, कामोठे या परिसरांतील वाढते नागरीकरण व वाढती लोकसंख्या यामुळे विद्युत पुरवठ्याची वाढती मागणी यावर उपाययोजना म्हणून कामोठे सेक्टर 25, भूखंड क्र.25 येथे नवीन 33/11 केव्ही सबस्टेशन उभारण्याचे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीतर्फे ठरविले होते व त्याप्रमाणे गेली काही वर्षे त्यांच्यामार्फत संबंधित भूखंड ताब्यात मिळण्याकरिता सिडकोकडे प्रयत्न चालू होते. भूखंड ताब्यात देण्याकरिता सिडको प्रशासनाने भाडेपट्टा रकमेसह अन्य रक्कम भरण्याबाबत महावितरणकडे कळविले होते. त्यानुसार महावितरणने प्रथम 10 टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर आता उर्वरित सर्व रकमेचा भरणा महावितरणतर्फे करण्यात आला असून तसे त्यांनी सिडको महामंडळाला कळविले आहे.
पुढील प्रक्रियेच्या अनुषंगाने या भूखंडाचा ताबा महावितरणला त्वरित देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना निर्देशित करावे, जेणेकरून लवकरात लवकर सबस्टेशनचे काम पूर्ण करून नागरिकांना अखंडीत वीजपुरवठा करणे महावितरणला शक्य होईल, असेही आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply