लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; केबीपी कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण
नवी मुंबई : बातमीदार
विद्यार्थी जीवनात यश, अपयश येत असते, परंतु अपयशाने खचून न जाता आपले करिअर घडवयाचे असते. जीवनात खेळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मन प्रसन्न करण्यासाठी खेळ आवश्यक असतो. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात प्रगती करून स्वतःचे व कॉलेजचे नाव जागतिक स्तरावर नामवंत करावे, असे मत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेजमध्ये जिमखाना विभागाच्यावतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. 13) करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय जलतरणपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऋतुजा उद्देशी व ठाणे बेलापूर इंडस्ट्रीजचे डायरेक्टर सुनील ब्रम्हे तर अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. सुनील ब्रम्हे यांनी क्रीडा क्षेत्रातील यश विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरीची विविध संधी उपलब्ध करून देते. तसेच खेळामुळे विविध कौशल्ये आत्मसात करता येतात. त्याचा जीवनात खूप उपयोग होतो. असे प्रतिपादन केले. तर ऋतुजा उद्देशी यांनी आपल्या जडणघडणीतील विविध अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच आपल्या यशामध्ये केबीपी कॉलेजचा खूप मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी महाराष्ट्र टाइम्सचे मनोज जालनावाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा, विभाग, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणार्या 160 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कॉलेजच्या चौफेर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व कॉलेजच्या अधिक प्रगतीसाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. जिमखाना चेअरमन प्रा. अर्जुन पोटिंदे यांनी जिमखाना अहवाल सादर केला. सूत्रसंचालन डॉ. आबासाहेब सरवदे, प्रा. धनश्री पछाडे यांनी तर आभार उपप्राचार्य सी. डी. भोसले यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्या, डॉ. राजेश्री घोरपडे, उपप्राचार्य चंद्रकांत क्षीरसागर, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.