Breaking News

देशातील पहिल्या ’एआय’ विद्यापीठाला मंजुरी

पनवेल ः वार्ताहर
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (मानवनिर्मित बुद्धिमत्ता) प्रेरित शिक्षण देणार्‍या भारतातील पहिल्या विद्यापीठाला अंतिम मंजुरी दिली आहे. या विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे युनिव्हर्सल एआय विद्यापीठ कार्यान्वित झाल्याची माहिती खात्यातर्फे जारी अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.
एआय क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर स्पेशलाइझ्ड अभ्यासक्रम देऊ करणारे युनिव्हर्सल एआय हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने या विद्यापीठाला मंजुरी दिली होती व तसे पत्र 25 जानेवारी 2023 रोजी पाठवले होते. आता विद्यापीठ कार्यान्वित करण्यासाठीही सरकारने मंजुरी दिली आहे. या विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट 2023पासून सुरू होणार आहे.
युनिव्हर्सल एआय विद्यापीठाचे कुलपती व संस्थापक प्रा. तरुणदीप सिंग आनंद घोषणेच्या वेळी म्हणाले की, 21व्या शतकातील सार्वत्रिक कौशल्यांचे शिक्षण देणारे भारतातील पहिले समर्पित एआय विद्यापीठ देशाच्या व राज्याच्या वाढ आणि विकासातील एक महत्त्वपूर्ण प्रेरक घटक ठरणार आहे. शिवाय हे विद्यापीठ नवीन एआय तंत्रज्ञानांच्या विकासासाठी संशोधन केंद्राची भूमिकाही बजावेल. त्यातून भारताला आर्थिक व तंत्रज्ञानात्मक लाभ होतील.
जग अधिकाधिक स्वयंचलनाकडे व डिजिटल रूपांतरणाकडे जात असताना जागतिक अर्थव्यवस्थेत देशाला स्पर्धात्मक स्थितीमध्ये राहण्यासाठी एआय शिक्षण व संशोधन महत्त्वाचे आहे. भारताच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाखाली देशातील तरुणांना कौशल्याधारित अभ्यासक्रमांची ओळख करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याद्वारे 2035 सालापर्यंत व्यावसायिक किंवा उच्च शिक्षणाच्या पदव्या प्राप्त करता येतील आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत 500 दशलक्षांची भर पडेल. सध्या एआय क्षेत्रातील संधी जागतिक स्तरावर व भारतात खूप विस्तृत आहेत. सरकारची धोरणेही अनुकूल आहेत. जगातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थांशी संबंध जोपासून, जागतिक करिअर संधी खुल्या करून देणारे व्यापक अभ्यासक्रम, उपलब्ध करून देण्यास आम्ही सज्ज आहोत, असेही प्रा. आनंद म्हणाले.

कर्जत येथे ग्रीन कॅम्पस

एआय प्रेरित शिक्षणाला समर्पित पहिले विद्यापीठ म्हणून नवीन युनिव्हर्सल एआय विद्यापीठ हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील खास विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम देऊ करेल. विद्यापीठाने कर्जत येथे ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. एआय व फ्युचर टेक्नोलॉजीजमधील (भविष्यकालीन तंत्रज्ञानातील) विशेष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम विकसित केले आहेत तसेच लिबरल आर्ट्स व ह्युमॅनिटीज, ग्लोबल अफेअर्स व डिप्लोमसी, कायदा, पर्यावरण व शाश्वतता आणि क्रीडाविज्ञान आदी विषयांवरील आधुनिक अभ्यासक्रमही विद्यापीठाने तयार केले आहेत.

 

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply