बाजार समितीचीही दुरवस्था
पनवेल : प्रतिनिधी
पनवेलच्या बाजार समितीच्या मालकीचे अडीच कोटी रुपयांचे कोल्ड स्टोरेज भाड्याने घेण्यासाठी कोणी तयार नसल्याने तीन वर्षे धूळ खात पडले आहे. त्यामुळे वर्षाला मिळणारे 21 लाख भाडे ही बुडाले आहे. छोट्या व्यापार्यांना फळे व इतर भाजीपाला ठेवण्यासाठी त्याचा वापर करता आला असता तोही होत नाही.
पनवेलच्या मार्केट यार्डमध्ये बाजार समितीने अडीच कोटी रुयापये खर्च करून फळे, भाजी पाला व तत्सम नाशीवंत माल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज बांधले आहे. हे कोल्ड स्टोरेज आय.जी. इंटरनॅशनल या कंपनीला दोन वेळा प्रत्येकी पाच वर्षाच्या कराराने भाड्याने देण्यात आले होते. त्याचे वर्षाला 21 लाख भाडे मिळत होते. या कंपनीचे येणारे कंटेनर मोठे असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने कोरोनाच्या वेळी या कंपनीने नवीन भाडे करार केला नाही. त्यामुळे तीन वर्षे हे कोल्ड स्टोरेज धूळखात पडले आहे.
कोल्ड स्टोरेजला भाडे नसल्याने येथील छोट्या व्यापार्यांना ते उपलब्ध करून दिले असते तर त्यांचा ही फायदा झाला असता व भाडेही मिळाले असते. या ठिकाणी शासकीत कोल्ड स्टोरेज आहे पण तेथे कमीत-कमी 100 बॉक्स असल्यास परवानगी दिली जाते. येथील छोटे व्यापारी 60-70 हजारांचा माल आणून धंदा करतात. 100 बॉक्ससाठी लाखो रुपयांची खरेदी करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाजार समितीने त्यांना कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिले असते तर त्यांचा फायदा झाला असता आणि मशीनरी ही गंजली नसती.
आय. जी. इंटरनॅशनल कंपनीला 10 वर्षे कोल्ड स्टोरेज भाड्याने दिले होते. त्यांनी सोडल्यानंतर कोरोना काळात आम्ही जाहिरात दिली होती, पण कोणी आले नाही. नंतर प्रशासक होते आता नवीन संचालक मंडळ आले आहेत. पुन्हा जाहिरात देत आहोत.
-भारत पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल
आय. जी. इंटरनॅशनल कंपनीने कोल्ड स्टोरेज भाड्याने घेतले होते तेव्हा कधी-कधी आम्ही आमचा माल तेथे ठेवत होतो. शासकीय कोल्ड स्टोरेज मध्ये 100 बॉक्स ठेवण्यासाठी आम्हाला लाखो रुपयांची खरेदी करावी लागेल. कारण चांगली सफरचंदाचा बॉक्स अडीच ते तीन हजार रुपये आहे. एवढी गुंतवणूक आम्हाला शक्य नाही. त्यामुळे दुसरीकडे खासगी कोल्ड स्टोरेजमध्ये आमचा माल ठेवतो. आम्हाला येथे सोय उपलब्ध करून दिली असती तर बरे झाले असते.
-फळ विक्रेता