मुंबई : प्रतिनिधी
लाल मातीतील खेळाडू म्हणून दम घुमवल्यानंतर कबड्डी, खो-खो आणि कुस्तीसारख्या देशी खेळांना वर्तमानपत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे हाडाचे क्रीडा पत्रकार, अॅथलिट, क्रीडा संघटक, खो-खो, कबड्डी प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे बुधवारी (दि. 20) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
सोनवडेकर यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत खेळाडू, संघटक, प्रशिक्षक आणि पत्रकार असा देशी खेळांना वाहिलेला संस्मरणीय प्रवास केला. क्रीडा पत्रकारितेत देशी खेळांना मानाचे स्थान मिळवून देण्यापूर्वी ते एक चांगले अॅथलिट म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांची धावण्याची आवड आणि लालबाग-परळमध्ये बालपण गेल्यामुळे कबड्डी, खो-खो त्यांच्या रक्तातच होते. एक धावपटू म्हणून त्यांनी रुपारेल महाविद्यालयातली आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले. तसेच ते एकाच वेळी कबड्डी आणि खो-खोसुद्धा खेळायचे. कबड्डीतही त्यांचा खेळ अफलातून होता. त्यांच्या खेळाच्या जोरावर रुपारेलने खो-खोत अनेक जेतेपदे पटकावली होती.