Breaking News

एमएमआरडीएचा कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग

सिडको उचलणार खर्चातील वाटा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या खर्चापैकी किती वाटा उचलण्यात यावा याबाबत चर्चा होऊन या मार्गाचा जो भाग नवी मुंबई व नैना क्षेत्रातून जातो त्यासाठीचा योग्य तो खर्च उचलण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयास सिडको संचालक मंडळाच्या सोमवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

एमएमआरडीएतर्फे मेट्रो मार्ग क्र. 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) उभारण्यात येत असून त्याचा तळोजा, नवी मुंबई व पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत (नमुंआंवि) विस्तार करण्यात येणार आहे.

या प्रकल्पास राज्ूय शासनाची मंजुरी मिळविण्याकरिता, तसेच या मार्गाचा काही भाग हा सिडकोच्या कार्यक्षेत्रातून जात असल्याने एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)मार्फत डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) पाहणी करून नैना व सिडको क्षेत्रातून जाणार्‍या या मार्गासाठी सिडकोतर्फे खर्चाचा योग्य तो वाटा उचलण्यात यावा, याबाबतची विनंती सिडकोला केली. या प्रकल्पाची अंमलबजावणी आर्थिकदृष्ट्या करणे शक्य व्हावे आणि त्यास सवलती व अनुदान मिळावे याकरिता प्रकल्पाची अंमलबजावणी ही पूर्णत: शासकीय पुढाकारातून व्हावी अशी शिफारस करण्यात आली आहे. या मार्गाची एकूण लांबी 20.756 किमी असून त्यासाठी 5,865 कोटी रु. इतका खर्च अंदाजित आहे. या मार्गाचा सुमारे चार किमी भाग हा सिडकोच्या कार्यक्षेत्रातून जातो. 

या मेट्रो मार्गामुळे कडोंमपा, एमएमआर, सिडको, नैना, तळोजा एमआयडीसी यांसारख्या विविध क्षेत्रांचा विकास होण्यास चालना मिळणार असून अन्य गजबजलेल्या शहरांतील लोकसंख्येचा ओघ येथे वळण्यास मदत होणार आहे. या मार्गामुळे उपरोक्त क्षेत्रांमध्ये विकासाच्या व रोजगाराच्या संधी निर्माण होऊन मुंबईवरील ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.

कल्याण-तळोजा मेट्रो मार्गामुळे उपरोक्त भागांत लोकांचे स्थलांतर होऊन त्या अनुषंगाने त्यांचा विकास होणार आहे. परिवहन केंद्रीत विकासाकरिता हा मार्ग अनुकूल ठरणार आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचा काही भाग हा सिडकोच्या नैना क्षेत्रातून जाणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1, 2, 3 व 4 यांसह या मार्गामुळे तळोजा एमआयडीसी क्षेत्र उर्वरित एमएमआर क्षेत्राशी उत्तमरित्या जोडले जाणार आहे. नैना, नमुंआंवि, तळोजा एमआयडीसी आणि एमएमआरमधील अन्य प्रदेशांना जोडण्या कामी महत्त्वाची भूमिका बजावणार हा मार्ग नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. हा मेट्रो मार्ग सन 2026पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply