Breaking News

पोलादपुरात 48 तासांत 500 मिमी पावसाची नोंद

पोलादपूरसह माटवण परिसरात पूरस्थिती; रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो; आंबेनळी घाटात दरड

पोलादपूर ः प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या 48 तासांमध्ये आतापर्यंतचा विक्रमी पाऊस पडल्याची नोंदतहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दुपारपर्यंत तब्बल 500 मिमी एवढी नोंद झाली आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये मंगळवारी रात्री दरड कोसळली. पोलादपूर शहरासह माटवण सवाद परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. मंगळवारी रात्रीपासून पावसाच्या मार्‍याने अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने विद्युतपुरवठा खंडीत झाला. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो झाले.
पोलादपूर तालुक्यात सोमवारी दुपारपासून पावसाने जोर धरला. मात्र, रात्री धुवाँधार वार्‍यासह पाऊस पडल्याने मंगळवारी सकाळी 152 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी 223 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाचा जोर बुधवारी दिवसभर कायमच राहिल्याने पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाने दुपारी पर्जन्यमान नोंदल्यानंतर 125 मिमी झाल्याचे दिसून आले. अशाप्रकारे केवळ 48 तासांमध्ये पोलादपूर तालुक्यात विक्रमी 500 मिमी नोंद झाल्याचे आढळून आले. विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतर ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आणि सावित्री या पाचही नद्यांची पात्रं ओसंडून वाहू लागली आहेत.
आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड भागात दरडी कोसळल्याने तहसिलदार कपिल घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन दरड हटविण्याकामी तातडीने आदेश दिले. हे दरडी हटविण्याचे काम सुरू असताना पोलादपूर पोलीसांनी आंबेनळी-महाबळेश्वर घाटातील वाहतूक बंद ठेऊन संभाव्य धोका टाळला. मंगळवारी रात्रीपासून पावसाच्या मार्‍याने अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने विद्युतपुरवठा खंडीत झाला. बुधवारी दुपारपर्यंत विजेचे खांब पुन्हा उभे करून विद्युतवाहक तारा ओढून विद्युतप्रवाह सुरळीत करण्यात आला. माटवण भागामध्ये काही घरांमध्ये अडकलेल्या ग्रामस्थांना स्थानिक ग्रामस्थांनी पुराचे पाणी शिरलेल्या घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले.
पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरण पावसाळयापूर्वी बॅकवॉटरचा साठा यंदा पावसाळयापूर्वीच रिकामा न केल्याने केवळ दोन दिवसांच्या पावसामध्ये धरणाचे बॅकवॉटर ओव्हरफ्लो झाले असून बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरणाने तब्बल 58.35 मीटर एवढी धोक्याची पातळी ओलांडली. या धरणासमोरील रानवडी आणि बोरावळे गावांकडे जाणार्‍या छोटया पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे पोलादपूर शहराच्या उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रालगतच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली.
श्रीदेवी गंगामाता घाट परिसरात चोळई नदी आणि सावित्री नदी पात्राचे पुराचे पाणी एकत्र येऊन सिद्धेश्वर आळी भागात पूरस्थिती निर्माण झाली. भैरवनाथनगराच्या नदीपात्रालगतच्या भागात समाधान शेठ यांच्या घरापासून सुभाष अधिकारी यांच्या घरापर्यत पुराचे पाणी जुना महाबळेश्वर रस्त्यावरून वाहू लागले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply