कर्जत : बातमीदार : कर वसुली करण्यासाठी कर्जत नगर परिषद प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरु केले असून, त्यामुळे सुमारे 90टक्क्यांपर्यंत कर वसुली झाली आहे. त्यात प्राधान्याने पाणीपट्टी आणि घरपट्टीचा समावेश आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीची कर वसुली जास्त असल्याने नगर परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचे कौतुक होत आहे.
यावर्षी कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली.निवडणूक होणार असल्याने मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कर वसुलीसाठी ही मोठी संधी असल्याचे जाणून आपल्या कर विभागाच्या माध्यमातून नियोजन केले. कर अधीक्षक सुरेश खैरे यांनी सर्व करदात्यांना संगणक प्रत स्वरूपात बिले पाठवून दिली. नगर परिषदेच्या उत्पन्नात घट होऊ नये, म्हणून पदाधिकारीदेखील हस्तक्षेप करीत नसल्याने 2018-19मध्ये कर्जत नगर परिषद आपली कर वसुली 90टक्के पर्यन्त करू शकली आहे.
नगर परिषद कर्मचारी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी सातत्याने करदात्यांची भेट घेत असल्याने आणि नगर परिषद आग्रही असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने कर्जत नगर परिषदेच्या उत्पन्नात यावर्षी कराच्या माध्यमातून मोठी रक्कम जमा झाली आहे. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी नगर परिषद प्रशासनाला फ्री हॅन्ड दिल्याने 2018-19या आर्थिक वर्षात कर्जत नगर परिषदेला आपली पाणीपट्टी वसुली एक कोटी 13 लाखांवर नेता आली आहे. त्याचवेळी मागील वर्षाची एक कोटी 5 लाख एवढी वसुलीदेखील करण्यात आली असल्याची माहिती पाणी पुरवठा अभियंता अशोक भालेराव यांनी दिली. तर 2018-19 मध्ये 5 कोटी 90 लाख म्हणजे 90 टक्के घरपट्टी वसुली झाली असल्याचे कर अधीक्षक सुरेश खैरे यांनी सांगितले.
दरम्यान, नगर परिषदेने आता इमारतींचे कर हस्तांतरणाकडे आपले लक्ष वळविले असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली आहे. इमारत बांधून झाल्यावर जोवर वापर परवाना मिळत नाही, तोवर ग्राहकांनी राहण्यास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून, त्यामुळे बिल्डर लॉबी धास्तावली आहे.