Breaking News

नवी मुंबई विमानतळाजवळील तीन मार्गांवर कृती समितीकडून लोकनेते दि. बा. पाटील नामफलकाचे अनावरण

पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने त्वरित तो केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा याकरीता लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी (दि.9) विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावल्याचे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले. आज क्रांती दिन आहे. त्याचप्रमाणे तुम्ही फार वेळ घेऊ नका; अन्यथा 11 ऑक्टोबर रोजी आम्ही मंत्रालयावर लाँग मार्च काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. त्याबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा, अशी सर्वपक्षीय कृती समितीची मागणी आहे. त्यामुळेच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तरघर, उलवे व चिंचपाडा या तीन प्रमुख मार्गांवर लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामफलक लावण्यात आले.
या वेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कार्यकारिणी सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, भाजप महिला तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, जे. डी. तांडेल, अतुल पाटील, विनोद म्हात्रे, संतोष केणे, गजानन पाटील, राजेश गायकर, विजय गायकर, दीपक पाटील, शैलेश घाग, प्रताप पाटील, नितेश वैती, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र वाडकर, गुलाब वझे, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, संतोष भोईर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बुधवारी सकाळी प्रथम तरघर येथे नंतर उलवे व चिंचपाडा येथे नामफलक लावण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी, राज्य सरकारचा या नावाला विरोध नाही. त्यामुळे दोन्ही विधिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला आहे तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी लवकर पाठवावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांना पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच त्याला मान्यता मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपले लाडके लोकनेते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाकरिता, दिनदुबळ्यांकरिता खर्च केले त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जावे ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. त्याकरिता अनेक वर्ष आपण लढलो. प्रत्यक्ष सरकारने ते जाहीर करावे, अशी अपेक्षा आहे. त्याकरिता आपण लढत आहोत. ते लवकरच होईल याची 100 टक्के खात्री आहे. आज या जागेवर आपण लावलेला फलक काढण्याची कोणाची हिंमत नाही, पण जे कोणी बोलतात ते कधी दोन वर्षात एकदा तरी आले का? काय चालले हे ऐकायलाही आले नाहीत. ते वार्‍यावर बोलतात त्यांची आपल्याला गरज नाही. आपले ध्येय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे आहे.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

आजच्या दिवशी गेल्या वर्षी सरकारने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो निर्णय घेतला त्याला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने मंजूरी दिली. केंद्र सरकारकडून मंजूरी मिळण्याची उत्कंठा आता सर्व भूमिपुत्रांमध्ये लागून राहिली आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आज प्रकल्पग्रस्तांच्या वतीने येथे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नामफलक उभारले जात आहेत. अनधिकृतरित्या फलक लावला असा आरोप करणारे आंदोलनात कधीच सहभागी झाले नव्हते. आज त्यांच्या पाठी जनमत नाही. त्यावेळी स्वप्नरंजनात वावरून ते पत्र लिहीत आहेत. यांचे सरकार असताना कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या.ज्यांनी भोगले आहे त्यांच्या समोर त्यांनी येऊन बोलावे.
– आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष

दि. बा पाटील कोण होते? असा प्रश्न या विमानतळावर येणार्‍याला पडेल. यासाठी त्यांच्या भूमीपुत्रांच्या लढ्याची माहिती, किती वेळा आमदार, खासदार होते याची माहिती येथे लावणे गरजेचे आहे.
-आमदार मंदा म्हात्रे, कार्यकारिणी सदस्य

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply