Breaking News

रोह्यात जादूटोणा करणार्‍या सात जणांना ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

धाटाव : प्रतिनिधी
रोह्यातील धामणसई गावच्या हद्दीत अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नऊ अनोळखी व्यक्ती जादूटोणा करीत असताना त्यांना सतर्क ग्रामस्थांनी पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या झटापटीत दोन जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काही व्यक्ती कोलाड विभागातील एका व्यक्तीसोबत शनिवारी (दि. 12) धामणसई येथील स्मशानभूमी व शाळेच्या आवारात जादूटोणा करीत असताना याचा संशय काही ग्रामस्थांना आला. त्यांनी संबंधितांना हटकले असता ते भांबावून गेले. आता आपली सुटका नाही असे दिसताच यातील दोघांनी तेथून पळ काढला, मात्र सात जणांना ग्रामस्थांनी पकडून रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी संतोष पालांडे (वय 50), प्रदीप पवार (वय 60), प्रवीण खांबल (वय 47), सचिन सावंत देसाई (वय 49), दीपक कदम (वय 41), मिलिंद साळवी (51, सर्व रा. रत्नागिरी) आणि राजेंद्र तेलंगे (वय 42, रा. हेटवणे, ता. रोहा) व इतर अनोळखी दोन व्यक्तींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सात आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे, तर फरारी दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.
दरम्यान, या घटनेत जादूटोणा करणार्‍यांमधील अनेक जण रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत व ते पैशांचा पाऊस पाडणार होते, अशी चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने रोहा पोलिसांनी तपास सुरू केला असून नऊपैकी सात आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. आता उर्वरित दोन आरोपींनाही अटक करून जादूटोण्याचे रत्नागिरी कनेक्शन काय आहे याचा तपास करावा आणि त्यांच्या म्होरक्याच्यादेखील मुसक्या लवकरच आवळल्या जाव्यात, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply