Breaking News

सरकारच्या नाकर्तेपणाचा प्रत्येक घटकाला फटका

आशिष शेलारांचा ठाकरे सरकारचे अभिनंदन करीत निशाणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील ठाकरे सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारचे अभिनंदन करत टीकेचा बाण सोडला आहे. राज्यातील प्रत्येकी घटकाला तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेला आहे, अशी टीका करीत  वर्षभरातील सरकारचे काम पाहता अभिनंदन करावे अशी परिस्थिती नाही. तरीही ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

आपल्या तीन पायाच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोठ्या जाहिराती, मुलाखती झळकल्या त्या महाराष्ट्रातीस शेतकरी, कष्टकरी, कामगार, श्रमिक, नागरिक सगळ्यांनी त्या वाचल्या असतील. शेतकरी, सरकारच्या धरसोडपणामुळे शैक्षणिक वर्षाचे नुकसान करून बसलेले विद्यार्थी असो किंवा उपासमारीची कुर्‍हाड कोसलेला कामगार, श्रमिक, मजूर, गणेशमूर्तीकार असो. प्रत्येकाला सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका बसला. मराठा समाजाचे नुकसान झाले तर पगार मिळत नाही म्हणून एसटीच्या कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काळाचे तुकडे करणारी आहे, असेही शेलार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

तिघाडी सरकारला ना कसले सोयर ना कसले सुतक. आपले मंत्री रोज सकाळी उठतात केंद्राच्या नावाने शिमगा करतात. आपले सरकार पाहिले की राज्यातील जनतेला आता हसावे की रडावे हे कळत नाही. परंतु सरकार रोज शांतपणे झोपते आणि सकाळी उठून तोंड वाजवत बसते. कोरोनाने कुटुंबातील सदस्य गेले त्यांचे उजाड चेहरे डोळ्यासमोर आल्यावर कोणीही अस्वस्थ होईल असे चित्र आहे. पण आपल्याला झोप लागते कशी, असा सवालही त्यांनी पत्राद्वारे केला आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान आणि विरोधकांवर टीका करण्याव्यतिरिक्त आपला महाराष्ट्रातील कार्यक्रम काय आणि कोणता? खोट्या अस्मितेची ढाल करून त्यामागे किती दिवस लपणार? माझे कुटुंब टार्गेट केले जातेय असे फसवे चित्र रंगवून किती दिवस जनतेची फसवणूक करणार?, असे सवालही शेलार यांनी केले आहे.

अतुल भातखळकर यांचा कवितेतून टोला

विचार वर्षभरातलं माझं एकतरी ठोस काम जनतेच भलं करणारं, मेंदूला ताण देत घे वर्षभराचा धोंडोळा, फुफ्फुसात पुरेशी हवा भर, मोठासा उसासा घे, स्मरल्या जर तोंडाच्या वाफा, पकाऊ एफबी लाईव्ह, बाष्कळ कोट्या, फालतू विनोद, सूडाचे कंड, थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का, अशी कविता करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकारला टोला लगावला. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ‘अभिनंदन मुलाखती’वर भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

जनता अभिनंदन कसे करेल?

पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते आणि पेला अर्धा सरला आहे, असेही म्हणता येते! पण पेला रिकामाच असेल आणि तो भरला आहे असे आभासी, खोटे, फसवे चित्र राज्य सरकार निर्माण करीत असेल, तर महाराष्ट्रातील जनता सरकारचे कसे बरं अभिनंदन करु शकेल, असेही ते म्हणाले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply