Breaking News

रोह्यात लॉजवर चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड

मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका

रोहे, धाटाव : प्रतिनिधी
रोहा पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या दमखाडी येथील श्रीराम लॉजवर शुक्रवारी रात्री उशिरा धाड टाकली. या प्रकरणी लॉज चालविणार्‍या मॅनेजरला अटक, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
रोह्यात सुरू असलेल्या अवैध, अनैतिक धंद्यांविरोधात गेले काही दिवस नागरिकांतून ओरड सुरू आहे. या विषयावर पंधरा दिवसांपूर्वी सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकत्रित बैठकही झाली होती. त्यामध्ये नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अवैध धंद्यांविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली होती तसेच गुरुवारी रोह्यातील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पोलिसांचे शुक्रवारी रोह्यात धाडसत्र सुरू होते. रात्री उशिरा शहरातील दमखाडी येथील श्रीराम लॉजवर कारवाई करण्यात आली.
या लॉजवर देहव्यापार सुरू होता. पोलिसांनी सापळा रचून मॅनेजर संजय वाघमारे (रा. नागोठणे) याला अटक केली. त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तीन महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर अधिक तपास करीत आहेत.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply