Friday , September 22 2023

पनवेल मनपातर्फे गणेशोत्सव मंडपासाठी ऑनलाईन परवाना

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडपासाठी यंदा ऑनलाईन परवाना पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे परवानगी विनाशुल्क मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील गणोशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी https://smartpmc.co.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आले आहे.
या वर्षी 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडळांसाठी तातडीने परवाना देण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी योजना अमलात आणली आहे.
गणेशोत्सवासाठी शहरातील रस्त्यांवर सार्वजनिक मंडळांच्या वतीने मंडप उभारले जातात. रस्त्यावर पादचारी मार्गावर खड्डे खोदल्याने रहदारीस, वाहतुकीस व पादचार्‍यांना अडचण निर्माण होऊन वाहतुकीस अडथळा होत असतो. अशा पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणार्‍या मंडप व तत्सम रचना महापालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय उभारता येत नाही तसेच त्या ठिकाणी महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय जाहिरात फलक, फ्लेक्स लावण्यास मनाई आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून एक खिडकी योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या वेबसाईटवर सिटीझन सर्व्हिस यामधून सर्व मंडळांना मंडप परवानगी देण्यात येते. तसेच https://smartpmc.co.in  या वेबसाईटवर गेल्यास मंडप परवानगी देण्यात येत आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन नोंदवल्यास उत्सवाच्या वेळी तात्पुरत्या स्वरुपात मंडपास परवानगी मिळणार असल्याची माहिती उपायुक्त गणेश शेटे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची काही प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply