Breaking News

कळंबुसरे रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत; ग्रामस्थांची मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील रस्त्यावर मागील चार-पाच वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून, प्रवासी वाहतूक व अन्य वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेऊन या कळंबुसरे गावातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी या मार्गावरील वाहनचालक व पादचार्‍यांकडून करण्यात येत आहे.

नियमित वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस, सहा आसनी रिक्षा, टेम्पो अशा वाहनांसह अवजड कंटेनर, ट्रेलर वाहतूकही नियमित सुरू असल्याने या कळंबुसरे गावातील रस्त्यावर झालेल्या घरांच्या अतिक्रमणामुळे नियमित वाहतूक कोंडी होत आहे. चिरनेर मार्गावरून कळंबुसरे गावात सुरुवातीपासून ते गावाची हद्द संपेपर्यंत चिरनेर विभागीय सहकारी भातगिरणीपर्यंत सुमारे 200 मीटर अंतर अतिक्रमणाने वेढले असल्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनांना तो रस्ता ओलांडने मुश्किल झाले आहे.

त्याच कळंबुसरे एसटी बस थांब्याजवळ सर्वात मोठे अतिक्रमण करण्यात आले असून, त्यापुढे मोठं-मोठे दगड लावण्यात आल्याने या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी नित्याची झाली असल्याने प्रवासी वर्गात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ए. जी. करपे यांनी कळंबुसरे गावातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा तत्काळ पाहणी करून संबंधित अतिक्रमण पावसाअगोदर हटवून हा रस्ता नियमित वाहतुकीसाठी मोकळा करण्यात यावा, अशी मागणी या मार्गावरील प्रवासी आणि वाहनचालकांनी केली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply