पूल नव्याने उभारणीची भाजप नेते किशोर म्हात्रे यांची मागणी
नागोठणे ः बातमीदार
नागोठणे ते वरवठणे गावाला जोडणार्या ऐतिहासिक पुलाने सुमारे 400 वर्षांचा टप्पा पार केला आहे. इंग्रजांच्या काळापासून वाहतूक सुरू असलेल्या या पुलाचा नागोठणेवरून रोहा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये जाताना प्रवासी शॉर्टकट म्हणून वापर करतात, मात्र दरवर्षी होणार्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन हा पूल जीर्ण झाला आहे.
पुलाच्या संरक्षक कठड्याला तसेच आधार देणार्या खांबांना भेगा जाऊन हा पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे सध्यातरी हा पूल प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे.
या ऐतिहासिक पुलावरून सततच्या जाणार्या प्रवासी वाहनांमुळे देखील पुलावरील रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. या पुलावरून दररोज वरवठणे, एमआयडीसी वसाहत, आमडोशी, वांगणी, काळकाई, वाडा या गावांमधून अनेक नागरिक आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने नागोठणे बाजारपेठेत येतात, परंतु या पुलाची अवस्था भीतीदायक झाली असल्याने व पुलाला भक्कम संरक्षक कठडे नसल्याने या अरुंद पुलावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी गेली अनेक वर्षे भाजप नेते राष्ट्रीय जनहित कामगार कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता, तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेदेखील या पुलाविषयी मागणी केली होती. पुलाला मंजुरीदेखील मिळाली, मात्र पुरातत्त्व विभागाचा या पुलाच्या बांधकामासाठी विरोध होत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने केवळ विरोध न करता आपल्या खात्यामार्फत लवकरात लवकर हा पूल बांधून द्यावा, अशी मागणी केली आहे अन्यथा भविष्यात होणार्या भयानक अपघातास संपूर्णपणे पुरातत्व विभाग जबाबदार असेल, असे त्यांनी सांगितले.