Breaking News

पोलादपूर पोलिसांचे भंगारचोरांवर विशेष लक्ष

महाड औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखाने बंद पडले असताना त्यामधील भंगारचोरी दिवसेंदिवस वाढीस लागली असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गस्त व तपासणी कामादरम्यान पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील लोखंडी बिम, तसेच अन्य वजनदार लोखंडी संरक्षक कठडयांसाठीच्या बांधकाम सामुग्रीबाबत सहायक पोलीस निरिक्षक आंधळे यांच्याकडून झालेली कृती ही हा आंधळेंचा पाय आता भंगारचोरांवर पडणार असल्याची आश्वासक कृती ठरत आहे.
पोलादपूर तालुक्यातील चिरेखिंड गावातील ट्रान्सफॉर्मरमधील तांबे धातूची तब्बल 75 हजार रूपये किंमतीची कॉईल चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस तपासात हा मुद्देमाल किंमती असल्याची चर्चा सुरू झाली. पोलादपूर शहरातील भैरवनाथनगरमधील पाणीपुरवठयाची सिंन्टेक्स्टची साठवण टाकी तुकडे तुकडे करून भंगारामध्ये विकल्याच्या घटनेवरून राजकारण तापल्यानंतर अशाप्रकारच्या अनेक साठवण टाक्यांचे तुकडे ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजनांची वासलात लावून नवीन योजनांचा मार्ग खुला करण्यासाठी कार्यकर्त्यांनीच भंगारमध्ये विकल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. पोलादपूर शहरामध्ये जुने काँक्रीटरस्ते खणून त्यामधील स्टील काढण्यासाठी तातडीने संपूर्ण मलबा चोरीला गेल्याची माहिती प्राप्त होऊनही याबाबत चर्चा झाली नाही. पोलादपूर तालुक्यात चौपदरीकरणासोबतच विविध विकास कामांची रेलचेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निधीतून सुरू असताना स्टील चोरीच्या घटनांमध्ये वाढझाल्याचे दिसून येत आहे. एलऍण्डटी सारख्या कंपन्यांदेखील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात स्टीलचे शिल्लक राहिलेले तुकडे चोरून नेण्यासाठी भंगारमाफियांशी संगनमत करीत असल्याचे जाणवले आहे.
लोहारमाळ येथे रस्त्यालगत पडलेला वीजेचा जुना लोखंडी खांब ट्रकमधून बाहेर दिसणार नाही एवढाच कापून ठेवताना एक व्यक्ती दिसून आल्याचा एक व्हिडीओ महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सूद यांना एका ग्रामस्थाने मोबाईलद्वारे पाठविल्यानंतर यासंदर्भात केवळ संबंधित कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला तंबी देणारं पत्र पोलादपूर उपविभागाकडून पाठविण्यात आले असले तरी हा प्रकार महाड-पोलादपूर दरम्यान सातत्याने सुरू असलेल्या जुने-नवे स्टील चोरीच्या घटनांपैकी असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द फक्त एनसी गुन्हा दाखल दाखल झाला. पोलादपूर शहरातील पार्टेकोंड ते सावंतकोंड दरम्यानचा एक लोखंडी पूल चोरीला गेल्याची तक्रार नगरपंचायत पोलादपूरकडून पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर शनिवारी रात्रीच्या अंधारात काही अज्ञात व्यक्तींनी याच पुलाच्या ठिकाणी या पुलाचे अवशेष आणून टाकले आहेत. रविवारी ही बातमी पोलादपूर शहरात सर्वत्र पसरल्यानंतर हा विजय विरोधी नगरसेवकांचा की पोलादपूर पोलीसांच्या मध्यस्थीचा अशी चर्चा जोर धरू लागली. आरोपीला अटक करण्याऐवजी मुद्देमाल छिन्नविछिन्न स्वरूपात घटनास्थळी पुन्हा हजर झाल्याने सर्वशृत अज्ञात आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई होण्याऐवजी त्याचा बचाव करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची सर्वत्र चर्चा सुरू हेऊन मावळली. पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील बांधकाम साहित्याची चोरी होत असल्याचा दिवसेंदिवस पोटठेकेदार असलेल्या एसडीपीएल कंपनीला संशय आला असताना पोलादपूर पोलीस ठाण्यास दिलेल्या तक्रारीनुसार गुप्तवार्ता विभागाने काढलेल्या माहितीवरून गुरांच्या गोठयामध्ये चोरून आणलेले स्टील अज्ञात आरोपीने लपवून ठेवल्याचे आढळून आले.
पोलादपूर शहरातील सैनिकनगर येथे सध्या वास्तव्यास असलेल्या प्रदीप तुकाराम चव्हाण (वय 36, जळगांवरोड, ता.जि.औरंगाबाद) यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून बांधकामाच्या साहित्याची सातत्याने चोरी होत असल्याची तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्याला दिली होती. यामध्ये 25 मी.मी. जाडीचे बांधकामाच्या जुन्या वापरत्या स्टीलचे तुकडे अंदाजे 250 कि.ग्रॅ. वजनाचे किंमत अंदाजे 15 हजार रूपये आणि 32 मी.मी. जाडीचे जुन्या वापरत्या स्टीलचे अंदाजे 350 कि.ग्रॅ. वजनाचे तुकडे यामुळे हे बांधकाम साहित्य हस्तगत करण्याचे आव्हान पोलादपूर पोलीसांसमोर होते. यावेळी गुप्तवार्ता विभागाने या बांधकाम साहित्याच्या चोरीवर बारकाईने लक्ष ठेवले असता भुयारी महामार्गाचे काम सुरू असलेल्या भोगाव गावाच्या हद्दीत 4 मार्च रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून 5 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एका गोठयामध्ये अंदाजे 36 हजार रूपये किंमतीचे हा बांधकाम साहित्यातील जुने वापरते स्टिल हस्तगत केले. याप्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची धमकी देत अनेक ग्रामस्थांची लूटमार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्ष्क आंधळे यांनी पकडलेल्या मुद्देमालाच्या चोरीचा गुन्हा पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, या गुन्ह्याची पोलादपूर पोलीसांकडून खबर कोणालाही देण्यात आली नव्हती. याप्रकरणी तरूण राजकुमार यादव (41, रा. सह्याद्रीनगर पोलादपूर) याने पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये 26 ऑगस्टरोजी दिलेल्या फिर्यादीमध्ये अज्ञात चोरटयांनी दि.28 जून ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचे इंग्रजी सी आकाराचे 69 नग, 29 हजार रूपये किंमतीचे इंग्रजी सी आकाराचे 5 नग, 18 हजार 900 रूपये किंमतीचे इंग्रजी सी आकाराचे 7 नग, 45 हजार रूपये किंमतीचे 300 नटबोल्ट, 5 लाख रूपये किंमतीचे अडीच मीटर लांबीचे 100 मेटल बीम असा एकूण 8 लाख 2 हजार 900 रूपये किंमतीचे लोखंडी संरक्षक कठडे उभारण्याचे सामान चोरून नेल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरिक्षक धुमास्कर हे सहायक पोलीस निरिक्षक म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत होते. महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक मारूती आंधळे आणि सहकारी शनिवारी रात्री मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची झडती घेत असताना अचानक पोलादपूरहून येणार्‍या महिंद्रा कंपनीच्या झायलो गाडीचा संशय आल्याने या गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीमध्ये गाडीत चोरून आणलेले स्टिलचे व लोखंडी ऍंगल व गाडीसह 15लाख 3 हजार 300 रूपयांचा ऐवज दिसून आला. चोरून आणलेल्या मुद्देमालासह महिंद्रा कंपनीची झायलो कार (क्र.एम एच 06 ए डब्ल्यू 6068) महाड एमआयडीसी पोलिसांनी जप्त केली असून तीन आरोपींनादेखील गजाआड केले आहे.
या तीन आरोपींपैकी आरोपी शुभम अनंत घाडगे व प्रतीक हरीश घाडगे हे दोघे महाड तालुक्यातील चांभारखिंड येथील रहिवासी असून तिसरा आरोपी अल्पवयीन विधीसंरक्षित आहे. पोलीसांनी मनाशी ठरविले तर चोरीचकारीचे धंदे सहज बंद होऊ शकतील. मात्र, राजकारण्यांच्या भंगारनेतृत्वामुळेच या भुमिकेपर्यंत पोलीस पोहाचत नाहीत हे दुर्दैव आहे.

  • लोखंडी सामान गायब होण्याचा सर्रास प्रकार
    पोलादपूर तालुक्यातील रस्त्यालगतचे क्रॅश बॅरियर्स तसेच अन्य लोखंडी सामान गायब होण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या रस्त्यालगतचे खांब काढून बाजूला ठेवून नवीन रस्त्यालगत विजेचे पर्यायी खांब उभारण्यात आले असताना त्या खांबांची वेळीच दिवील रस्त्यावरील तुर्भे सबस्टेशनच्या आवारात वाहतूक न झाल्याने चोरीला जाण्याचा प्रकार वाढला आहे. समुद्रातून लोटाभर पाणी कमी झाल्याने काही फरक पडत नाही या न्यायाने गेल्या काही महिन्यांपासून ट्रक्स, कंन्टेनर्समधून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक होणार्‍या स्टीलमधून काही स्टील परस्पर संगनमताने काढून बाजूला साठविणे, रस्त्यालगतचे जुने विजेचे खांब काही अंतरावर ठेऊन कालांतराने ते ट्रकबाहेर दिसणार नाहीत इतपत लांबीने कापून त्यांची वाहतूक करणे, दरीलगतचे क्रॅश बॅरियर्स दरीत ढकलून कालांतराने त्याची परस्पर वाहतूक करून विक्री करणे अथवा त्याच क्रॅश बॅरियर्सना चंदेरी रंग लावून ठेकेदाराला नवीन क्रॅश बॅरियर म्हणून विकणे आदी कामांमध्ये स्टील गायब करण्यामध्ये सक्रीय असलेल्या व्यावसायिकांना संबधित खात्यातील काही लोकांचेही छुपे सहकार्य मिळत आहे.
    -शैलेश पालकर

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply