दुबई : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 19 वर्षांखालील विश्व एकादशची घोषणा केली आहे. या संघात तीन भारतीयांनी स्थान मिळवले आहे.
आयसीसीने निवडलेल्या या संघात बांगलादेशचे नेतृत्व करणार्या अकबर अलीकडे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर या संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि जलद गोलंदाज कार्तिक त्यागी यांचा समावेश करण्यात आला आहे. यशस्वीने स्पर्धेत सहा सामन्यांत 400 धावा केल्या आहेत. बिश्नोईने तितक्याच सामन्यांत 10.64च्या सरासरीने 17 बळी टिपले, तर त्यागीने 13.90च्या सरासरीने 11 गडी बाद केले.
आयसीसीने विश्वविजेत्या बांगलादेश संघातील अकबर अलीशिवाय अन्य दोन खेळाडू शहादत हुसैन आणि महमदुल हसन जॉय यांचा संघात समावेश समावेश आहे. याखेरिज अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी दोन, तसेच श्रीलंकेचा एक खेळाडू संघात आहे, तर कॅनडाचाही एक जण 12वा खेळाडू म्हणून आहे.
या संघाची निवड मॅरी गॉडबीर, इयान बिशप, रोहन गावसकर, नताली जर्मनोस आणि श्रेष्ठ शाह यांच्या समितीने केली आहे.
असा आहे संघ : अकबर अली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल (भारत), इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान), रविंन्दु रसन्था (श्रीलंका), महमदुल हसन जॉय (बांगलादेश), शहादत हुसैन (बांगलादेश),नईम यंग (वेस्ट इंडिज), शफीकुल्लाह गफारी (अफगाणिस्तान), रवी बिश्नोई (भारत), कार्तिक त्यागी (भारत), जायदेन सील (वेस्ट इंडिज), अकील कुमार (कॅनडा, 12वा खेळाडू).