महाड : प्रतिनिधी
महाड एमआयडीसीमधील प्रसोल या रासायनिक कारखान्यात गुरुवारी (दि. 5) सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास वायुगळती होऊन एका कामगाराचा मृत्यू आणि चार कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर महाडमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील आमशेत या गावाजवळ असलेल्या प्रसोल कारखान्यात होणार्या वायूगळती अपघातांची मालिका कायम राहिली आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये एका प्लांटमध्ये काम करीत असलेल्या अखिल सिंग, प्रवेश ठाकूर, इंद्रजित पटेल, पंकज डोळस (कोल्हापूर), संतोष मोरे नाते (महाड) या पाच कामगारांना हायड्रोजन सल्फाईडची बाधा झाली. यामुळे अखिल सिंग याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार कामगार जखमी झाले. जखमी कामगारांवर महाडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र संतोष मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
या प्रकरणासंदर्भात कारखाना व्यवस्थापन भरत शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्लांट बंद होता व त्यामुळे नक्की काय झाले हे कामगारांनाच माहीत आहे, असे सांगितले. जखमी कामगार परवेश ठाकूर याने या प्लांटमध्ये असलेल्या टाकीतून सल्फर बाहेर काढायचे होते. ऑपरेटर सेफ्टी किट आणण्यासाठी गेला होता. आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो आणि ही घटना घडली, असे सांगितले.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …