नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन विनियमावली (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि.12) दिले.
कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्या वेळी मंत्री सामंत बोलत होते. या बैठकीस आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे.एम. म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, बबन पाटील, जासई (ता. उरण) येथील महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, राजेश पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे. या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण व पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश आहे. नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये 23 गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित 152 गावांची प्रारूप विकास योजना 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे. नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. असे मंत्री उदय सामंत यांनी या वेळी सांगितले.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, येणार्या कालावधीमध्ये प्रत्येक गावनिहाय ज्या कुठल्या समस्या असतील त्या सिडको-नैनाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. त्यासाठी ग्रामस्थांना कुठल्याही पद्धतीची अडचण भासली, तर त्या दृष्टिकोनातून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानच्या निवेदनाच्या अनुषंगानेही पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक विचार करेल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …