Breaking News

उरण विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार; 100 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

मोहोपाडा : प्रतिनिधी
प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्याच्या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारा निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील असतो, परंतु एखादा लोकप्रतिनिधी असा असतो की जो त्यामध्ये विशेष असे प्रयत्न करतो. काम, निधी मंजूर होण्यासाठी सातत्य, पाठपुरावा लागतो आणि ते आमदार महेश बालदी करतात. म्हणूनच उरण विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा अवतरली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29) येथे केले.
कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मोहोपाडा येथील अचानक मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. त्या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत, राष्ट्रवादीचे नेते व मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंढे, सरपंच उमाताई मुंढे, उपसरपंच भूषण पारंगे, चौकच्या सरपंच रितू ठोंबरे, तुपगावचे सरपंच सरपंच रवींद्र कुंभार, सावळे सरपंच सुनील माळी, कराडे खुर्दच्या उपसरपंच मिनल ठोंबरे, माजी सरपंच किरण माळी, विजय मुरकुटे, वडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुरेश पाटील, भाजप गुळसुंदे जि.प.विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, प्रवीण जांभळे, वासांबे जि.प.विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, पं. स. विभागीय अध्यक्ष आकाश जुईकर, ज्येष्ठ नागरिक प.ग. पळणीटकर, वर्षा पाटील, चेतन जाधव, संदीप म्हात्रे आदींसह रसायनी-पाताळगंगा परिसरातील भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर सबका साथ सबका विकास या मंत्राने प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये विकास होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे. हा विकास होत असताना या मतदारसंघामध्ये विकासनिधी कसा मिळेल यासाठी आमदार महेश बालदी यांनी प्रयत्न व पाठपुरावा करीत असतात. येणार्‍या काळात हा संपूर्ण जो भाग आहे, येथे असणार्‍या जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायत किंवा नगर परिषद होणे अत्यंत गरजेचे आहे आणि मला खात्री आहे की आमदार महेश बालदी व त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी त्या दिशेने पावले उचलतील, जेणेकरून स्थानिक पातळीवर नियोजनाला चांगल्या पद्धतीने गती मिळेल. त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहूया.
आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, उरण विधानसभा मतदारसंघात हजारो कोटींची कामे होताना दिसत आहेत. यासाठी मी आमदार महेश बालदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. या परिसरापासून जेएनपीटीला जोडणारा जो 3500 कोटींचा महामार्ग साकारणार आहे तो खर्‍या अर्थाने त्या पुढच्या कालावधीत गतवैभव प्राप्त करून देईल आणि या मोहोपाडा, चौक परिसराला सोन्याची झळाळी मिळले. इतके परिवर्तन त्या एका रस्त्याच्या माध्यमातून सगळ्या परिसरात होणार आहे. आधीच्या आमदारांना काय जमले नाही, कारण कूपमंडूक प्रवृत्ती. स्वतःच्या मर्यादित क्षेत्राच्या पलीकडे पहायचे नाही. केवळ सरकार जे करेल त्याला मी मान्य केले अशा पद्धतीने त्याच्यावर फुशारकी मारायची याच्या पलीकडे त्यांनी कधी काही करता आले नाही, परंतु आमदार महेश बालदी या मतदारसंघात फिरत असतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात सदैव जनहित व परिसर विकासाचा विचार असतो.
वडगाव ग्रामपंचायत हद्दीत बोरीवली गावाजवळ एक बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प जो गोवंडीला नकोसा झाला होता तो इथे येऊ घातलाय. त्याला सर्व सरपंच, सर्व नागरिक म्हणून आम्ही विरोध केलाय, पण तुम्हीसुद्धा कुठेतरी पाठपुरावा करावा, असा सूर या वेळी व्यक्त झाला. त्यावर आमदार महेश बालदी म्हणाले की, मी या ठिकाणी शब्द देतो. आपण सर्व एकत्र आहोत. एकमुखाने बोरीवली येथे येऊ घातलेल्या प्रकल्पाला विरोध करू.
मोहोपाडा सरपंच उमाताई मुंढे म्हणाल्या की, कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी डिजिटल माध्यमाद्वारे विकासकामांचा शुभारंभ होत आहे या वासांबे ग्रामपंचायतीची प्रथम नागरिक म्हणून या विभागामध्ये विकासकामांसाठी भरघोस निधी आपण देऊ केला. कोट्यवधींचा निधी आणून लोकहित जोपासण्याचे काम आपल्या माध्यमातून होत आहे. या विभागात न भुतो न भविष्यति असा भरघोस निधी आणून आपण या विभागात नक्कीच विकासाची गंगा आणलेली आहे.
या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कोन-सावळे रस्ता तयार करणे 50 कोटी रुपये, चौक-लोहोप रस्ता सहा कोटी, दांड-मोहोपाडा-तुराडे रस्ता 21 कोटी, गुळसुंदे-कराडेदरम्यान नदीवर ब्रिज 10 कोटी, रिस पाणीपुरवठा योजना 22 कोटी, मोहोपाडा तलाव सुशोभीकरण 4 कोटी, चौक तलाव सुशोभीकरण तीन कोटी, जांभिवली-कराडे रस्ता तीन कोटी, पळस्पे-कुडावेदरम्यान नदीवर ब्रिज 2.50 कोटी, पळस्पे-वडवली रस्ता दोन कोटी, चौक येथे सभागृह एक कोटी, बोरगाव सभागृह एक कोटी, तळेगाव-पानशिल, वयाळ-वाशिवली रस्ता आठ कोटी, मोहोपाडा बाजारपेठ रस्ता एक कोटी आदी विकासकामांचे एलएडी स्क्रीनद्वारे डिजिटल भूमिपूजन करण्यात आले.
वासांबे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे माजी सदस्य स्वप्नील राऊत यांनी समर्थकांसह या वेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले, तर मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप रसायनी महिला मोर्चाच्या वतीने अयोध्या येथील रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती भेट नेहा भूषण पारंगे, संचिता सचिन तांडेल, रितू सुधीर ठोंबरे, अरुणा विनायक मुंढे, मनीषा दिलीप कर्णूक यांनी दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply