चिरनेर ः प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या धुवाँधार पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपीक पाण्याखाली गेले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे तयार झालेल्या भातपिकाची चिखल-माती झाल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. उरण तालुक्यातील शेतकर्यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. उरणच्या पश्चिम भागात औद्योगिकरणामुळे भातशेती नामशेष झाली असली तरी उरणच्या पूर्व भागात आजही शेकडो एकर शेतीत शेतकरी भाताचे पीक घेतात. वाढती महागाई तसेच मजुरांचे दर वाढल्याने भातशेती सध्या फायद्याची राहिली नाही. तरी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शेतकरी भातपीक घेत आहेत. येथे उच्च प्रतीचा तांदूळ मिळत असल्याने अनेक शेतकरी खर्च करून भाताच्या विविध वाणांची लागवड आवडीने करतात. या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे भातशेती जोमदार झाली होती. त्यात चांगले पीकसुद्धा आले होते, मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या धुवाँधार वादळी पावसामुळे जोमदार पीक शेतात साचलेल्या पाण्याखाली बुडाले आहे. अवघ्या काही दिवसांत या पिकाची कापणी झाली असती, मात्र शेतात साचलेले पाणी कितीही प्रयत्न करूनही कमी होत नसल्याने पाण्यात बुडालेले पीक कुजून त्याची चिखल-माती झाल्याचे चित्र शेकडो एकर भातशेतीत दिसत आहे. या अस्मानी संकटाने शेतकरीवर्ग पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून तो शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय निर्णयानुसार शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
-उमेश गाताडी, कृषी अधिकारी, उरण
भातशेती सध्या तोट्यातील व्यवसाय झाला आहे. त्यातच अशा अस्मानी संकटाने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी भातशेतीला पर्यायी व्यवसाय शोधण्याची आता वेळ
आली आहे. -धनाजी नारंगीकर, प्रयोगशील शेतकरी, चिरनेर