Breaking News

स्वच्छतागृहावर चालविला हातोडा

नेरळ ग्रामपंचायतीचा अजब कारभार

कर्जत ः बातमीदार

50 वर्षे जुने आणि बाजारपेठेत असलेले एकमेव स्वच्छतागृह नेरळ ग्रामपंचायतीने तोडायला घेतल्याने नेरळकर हैराण झाले आहेत. परिणामी नेरळ ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराला आता नेरळकर पुरते वैतागले आहेत.पनेरळ मुख्य बाजारपेठेत असलेल्या शिवसेना शाखेजवळील स्वच्छतागृह गेली अर्धा दशकाहून अधिक काळापूर्वी बांधण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात नेरळ सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, तसेच मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणूनही नेरळचा नावलौकिक आहे. व्यापारी वर्गासाठी तसेच येथे खरेदीसाठी येणारे नागरिक विशेषतः महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा होत असल्याने हे स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. नेरळ परिसराला 40 गावांहून अधिक आदिवासी वाड्या-पाडे जोडली गेली आहेत.

सध्या हे सार्वजनिक स्वच्छतागृह नेरळ ग्रामपंचायतीकडून तोडण्याचा घाट घातला गेला आहे. नेरळच्या मुख्य बाजारपेठेतील शिवसेना शाखा कार्यालय परिसराला वाहन पार्किंग व स्थानिक रहिवाशांच्या सांडपाण्याने ग्रासले आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील सार्वजनिक स्वच्छतागृहात पाण्याच्या कमतरतेमुळे दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रार केली होती, मात्र ग्रामपंचायतीने याची खातरजमा न करता थेट येथे उपयोगात असलेले जुने स्वच्छतागृहच तोडले आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने याबाबत खबरदारी म्हणून योग्य ती उपाययोजना किंवा पर्यायी मार्ग सामान्यांसाठी उपलब्ध करून द्यायचा असताना तसे न करता सार्वजनिक स्वच्छतागृहच तोडण्यात आले.

नेरळ शहर अनेक समस्यांच्या गर्तेत रुतले आहे. नेरळ ग्रामपंचायतीवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी झटणारी शिवसेना आता खरंच सर्वसामान्यांसाठी धावणार का, हादेखील प्रश्न यानिमित्त उभा राहिला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून काही स्थानिकांच्या स्वार्थासाठी व लोभापायी स्वच्छतागृह तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply