खोपोली : प्रतिनिधी
शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाबद्दल गुरुवारी (दि. 23) महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खोपोलीत फटाक्यांची आतशबाजी करीत जल्लोष केला.
2014ची पुनरावृत्ती होत संपूर्ण देशात नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला. यात मावळ मतदार महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे पुन्हा निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव केला.
या पार्श्वभूमिवर गुरुवारी दुपारी शिळफाटा येथे महायुतीचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोर उपस्थित झाले. शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल पाटील व उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणालला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला.
यावेळी भाजपचे सतीष रावळ, सौरभ रावळ, प्रिन्सी कोहली, शिवसहकार सेनेचे हरिष काळे, संतोष मालकर, सुरेखा खेडकर, माजी नगरसेवक दिलीप पुरी, युवा सेनेचे सोनू शेलार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागोठण्यात भाजपकडून पेढ्यांचे वाटप
नागोठणे : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ यश मिळविल्याबद्दल नागोठणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी शिवाजी चौकात जल्लोष साजरा
करण्यात आला. भाजप रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे, मनोज धात्रक, विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, असगर सय्यद, सचिन मोदी, संतोष लाड, विठोबा माळी, मनोहर माळी, शेखर गोळे, ज्ञानेश्वर शिर्के आदींसह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकात फटाक्यांची आतषबाजी केल्यानंतर स्थानिक भाजपाकडून नागरिकांना 100 किलो पेढ्यांचे वाटप करून आनंद साजरा केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नागोठणे शहरातून मिरवणूकही काढली होती.