अलिबाग : प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार 352, तर गीते यांना चार लाख 25 हजार 568 मते मिळाली.
रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे राजी मतदान पार पडले. यामध्ये 10 लाख नऊ हजार 563 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारसंघात 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, पण खरी लढत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात होती. ही लढत चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तसे झाले नाही. सुनील तटकरे यांनी सहज विजय मिळवला तोही 2019च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी. 2019मध्ये तटकरेंनी अनंत गीते यांचा 31 हजार 438 मतांनी पराभव केला होता. या वेळी 82 हजार 784 मतांनी विजय मिळवला. तटकरेंची आघाडी 51 हजार 346 मतांनी वाढली.
अलिबागजवळील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी पुढेही सुरूच राहिली.
रायगड मतदारसंघात सुनील तटकरे व अनंत गीते यांच्यासह 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण याही निवडणूक लढवत होत्या. त्यांच्यापेक्षा ‘नोटा’ला जास्त मते मिळाली. या मतदारसंघात नोटाला तिसर्या क्रमांकाची मते मिळाली. चव्हाण यांना 19 हजार 618 मते मिळाली, तर 27 हजार 270 मतदारांनी नोटाला पसंती दिली. 11 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला, परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही. मुस्लीम समाजाची मते मिळवण्यातदेखील तटकरे यशस्वी झाले.
जनतेचे ऋण कधीही विसरणार नाही!
महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. मी रायगड, रत्नागिरीमधील जनतेचे ऋण कधीही विसरणार नाही. महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आगामी काळातही काम करणार आहे. केवळ लोकसभेपुरता नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीतही कोकणातील सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार खासदार सुनील तटकरे यांनी विजयानंतर व्यक्त केला.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …