Breaking News

महत्त्वाकांक्षा समोर ठेवून अभ्यास करा -‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी

सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 13) आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (निवृत्त आयएएस), सल्लागार अनिल पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, अ‍ॅड. विनायक कोळी, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, भागुबाई चांगू काना ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सान्वी देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय प्रदेश निरीक्षक रोहिदास ठाकूर, प्रदेश उपनिरीक्षक शहाजी फडतरे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी मार्गदर्शन करताना, आई-वडिलांचे ऋण सदैव लक्षात ठेवले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षा समोर ठेवून अभ्यास केला तर ते फार मोठी उंची गाठू शकतील, असे प्रतिपादन केले. त्यांनी आपल्या भाषणात कॉलेजचे ग्रंथालय व इतर सुविधांचेही कौतुक केले.
‘रयत’चे सल्लागार अनिल पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, इंटरनेट व मोबाईल या पलीकडेही जग आहे, ते पाहिले पाहिजे. 21व्या शतकातील आव्हानांसाठी तयार राहा तसेच हे जग तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सर्वांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वयंम, मूकस्, कोर्सेरा इत्यादी ऑनलाईन माध्यमांचा कौशल्य विकासासाठी वापर करायला हवा तसेच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अभ्यासक्रमातील नवनवीन संधीचा त्यांनी या वेळी उल्लेख केला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षण घेतले पाहिजे. भविष्य घडवण्यासाठी धडपड केली पाहिजे, मेहनत घेणे आवश्यक आहे.
सुरुवातीस प्राचार्य डॉ. एस.के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आर.व्ही. येवले यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
स्व. चांगू काना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या कौतुक सोहळ्यात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. येवले, डॉ. जी.एस. तन्वर, प्रा.ए. व्ही. पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. एस.एन. वाजेकर यांनी मानले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्टुडण्ट कौन्सिल व स्टुडण्ट वेलफेअर विभागाच्या चेअरमन डॉ. एम.ए. म्हात्रे, आयक्यूएसी विभागाचे समन्वयक डॉ. बी.डी. आघाव, महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ. आर.डी.म्हात्रे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी ’लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’

पनवेल : रामप्रहर वृत्त महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण …

Leave a Reply