खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघर परिसरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते पाहता येथील गुन्हेगारी घटनांना आळा घालावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली असून याबाबतचे निवेदन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वैशाली गलांडे यांना भाजपच्या वतीने दिले.
निवेदन देतेवेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बावीस्कर, शत्रुघ्न काकडे, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका आरती नवघरे, महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, समीर कदम, किरण पाटील, संजय घरत, प्रवीण बेरा, अमर उपाध्याय, सचिन वास्कर, शैलेंद्र त्रिपाठी, दुर्गा बन्सल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, नुकताच खारघर सेक्टर 35मध्ये दिवसाढवळ्या टाकलेल्या दरोड्याच्या प्रयत्नामध्ये ज्वेलर्स दुकानातील मौल्यवान वस्तूंची चोरी झाली. एकंदरीत गेल्या पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत खारघर परिसरात मोबाईल चोरी, स्त्रियांच्या गळ्यातील दागिने चोरणे, पार्क केलेल्या गाड्यांची चोरी या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. ज्वेलर्सवरील दरोड्याच्या घटनेमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिल्याचे दिसून येत नाही. या सर्व घटनांमुळे खारघर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले आहे.
गुन्हेगारांवर वचक रहावा व मौल्यवान वस्तूंच्या चोरीपासून सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण रहावे, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण तयार व्हावे याकरिता आवश्यक उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात तसेच अशा घटनांमध्ये सामील असणार्या गुन्हेगारांना शोधून काढून त्यांना कडक शिक्षा होईल या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वैशाली गलांडे यांच्याशी चर्चा करून खारघर परिसरातील गुन्हेगारी घटनांना पायबंद घालण्याची मागणी केली. गलांडे यांनी आरोपींचे धागेदारे आम्हाला मिळाले असून लवकरात लवकर त्यांना पकडले जाईल, असे सांगितले.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …