Breaking News

पनवेलमधील खासगी रुग्णालयांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लससाठा

पनवेल ः प्रतिनिधी

मुंबईस्थित एका नामांकित संस्थेच्या वतीने पनवेल कार्यक्षेत्रातील ज्या रुग्णालयांना कोविड लसीकरणाची परवानगी मिळाली आहे, अशा रुग्णालयांना लवकरच कोविड लसींचा साठा प्राप्त होणार आहे. ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणे शक्य आहे, त्यांनी या रुग्णालयांमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. डेल्टा प्लस या कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका वाढला आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणार असल्याचे भाकीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जात आहे. सद्यस्थितीत कोरोनावर लसीकरण हा एकच उपाय मानला जात आहे. त्यामुळे जास्तीत नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. पनवेल महानगरपालिका आपल्या 18 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करीत आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पनवेल कार्यक्षेत्रातील शासकीय लसीकरण केंद्रे लसींचा तुटवडा असल्याने बंद ठेवावी लागत आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी मुंबईस्थित एका नामांकित संस्थेशी समन्वय साधून पनवेल महानगरपालिकेने ज्या रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे, अशा रुग्णालयांना लसींचा साठा प्राप्त करून देण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्फुटनिक अशा तिन्ही प्रकारच्या लसी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणे शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. महापालिकेने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील 61 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली. यातील 11 रुग्णालयांमार्फत कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता इतर रुग्णालयांनादेखील कोविड लसींचा साठा प्राप्त करून देण्यात येणार आहे.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply