पनवेल ः वार्ताहर
उरण येथील युवतीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी (दि.31) सकाळी पनवेल सेशन कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
युवतीच्या पालकांनी 25 जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांना उरण रेल्वे स्थानक परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. तपासात दाऊद शेख नावाच्या युवकाचा व तिचा दूरध्वनी झाल्याचे समोर आले. दाऊद हा उरणमध्ये आढळला नाही. तो कर्नाटक येथील मूळ गावी गेल्याची शक्यता वर्तवली होती. मंगळवारी सकाळी दाऊदला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अॅट्रोसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अधिकारी साकोरे यांनी सांगितले की, दाऊद आणि ही युवती यांची ओळख होती. ते एकाच शाळेत होते. दाऊद करोनाकाळात कर्नाटकमध्ये गेल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. सध्या तरी यात तो एकच आरोपी असून गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली का, याशिवाय हत्येचे नेमके कारण काय आहे, आदी प्रकरणी तपास सुरू आहे, असे साकोरे यांनी सांगितले. ही युवती अल्पवयीन असताना दाऊदविरोधात तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …