Breaking News

‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे’

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ’लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नाव देण्यासाठी आपण आग्रही राहावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नवी दिल्ली येथे बुधवारी (दि.31) करण्यात आली.
या वेळी कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार संजीव नाईक तसेच कृती समितीचे कार्यकारिणी सदस्य आमदार महेश बालदी आणि दि.बा.पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील उपस्थित होते. या सर्वांनी कृती समिताचे एक निवेदन केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना दिले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या वेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात आपण निश्चितच पुढाकार घेऊ, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत थोड्याच दिवसांत माझ्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी नक्कीच सकारात्मक चर्चा करू, असेही केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी ठोस आश्वासन दिले. सर्वपक्षीय कृती समितीने यापूर्वी तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयात आणि नवी मुंबईतील साईट कार्यालयात भेट घेतली असता, त्यांनीही नामकरणासाठी पूर्ण पाठिंबा आणि मदतीची ग्वाही दिली होती, याचा उल्लेखही या निवेदनात केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, असावे यासाठी जून 2021मध्ये ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई जिल्ह्यात एक भव्य आंदोलन झाले. लोकनेते दि. बा. पाटील हे पेशाने वकील होते. ते स्थानिक रहिवाशांसाठी केवळ आदर्शच नव्हते तर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदानही दिले आहे. शेतकर्‍यांसाठी कायदे प्रस्थापित करणे, जमिनीचे हक्क, भूजल नियमन कायदा यांसारखे कायदे आणणे आणि विविध कायदेशीर सुधारणांद्वारे शेतकर्‍यांचे अधिकार वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
जमीन विरूद्ध जमीन कायदा हा त्यांच्या संघर्षाचा परिणाम होता. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. पाच वेळा (जवळपास 25 वर्षे) आमदार म्हणून काम केले आणि दोन वेळा खासदारही होते. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही होते. त्यांचे संपूर्ण राजकारण हे जनसेवेला समर्पित होते. विमानतळाला त्यांचे नाव देणे हा या दिग्गज व्यक्तीचा खरा सन्मान ठरेल आणि विमानतळ आणि नवी मुंबईचाच नव्हे तर राज्याचा आणि देशाचा दर्जा उंचावेल.
लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई जिल्ह्यांतील हजारो नागरिकांचा सहभाग घेऊन मानवी साखळी, मशाल रॅली, सिडको येथे निदर्शने आणि काम बंद यांसारखी विविध आंदोलने आणि आंदोलने केली आहेत. या नामकरणाच्या समर्थनार्थ सरपंच, पंचायत समित्या, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी हजारो ठराव आणि पत्रे सरकारला पाठवली आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत या नामकरणासाठी ठराव मंजूर केला आणि तो ठराव नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला आहे. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी हे निवेदन आम्ही आपणास सादर करीत आहोत, असे कृती समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सांगितले.
त्या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील आणि विशेषत: चार जिल्ह्यांतील जनतेच्या वतीने आम्ही सर्वपक्षीय समिती विनंती करतो की, कृपया यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर करून नवी मुंबई विमानतळाचे नाव लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असेही अखेरीस निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply