पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील 1993 साली 10 वी उत्तीर्ण झालेल्या 81 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पीपीएचएस मैत्री पार्क हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. व्हाट्स अँप ग्रुप म्हटलं की फक्त विरंगुळा आणि मजा मस्ती बर्याच जणांच्या डोळ्यासमोर येते. परंतु असेही काही बरेच ग्रुप आहेत की त्यांनी समाजसेवेचा वसा घेऊन आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचे काम करीत आहेत. यातीलच पेणमधील 1993 साली 10 वी उत्तीर्ण झालेल्या जवळपास 81 विद्यार्थ्यांनी आपला ग्रुप तयार करून गेली 6 वर्षे ग्रुप च्या माध्यमातून ते अनेक सामाजिक कामे करीत आहेत. या ग्रुपने पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे पेण तहसिल कार्यालयात जावून या ग्रुपच्या सदस्यांनी तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. सामाजिक बांधिलकी जपणार्या या व्हाटस अँप ग्रुपचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.